भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचनाम्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा सरकारच्या काळात भरीव निधी उपलब्ध करून दिला. केंद्र सरकारनेही पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदी संवर्धन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला, त्यामुळे सांगेल ते करणार आणि करेल तेच सांगणार हा भाजपाचा बाणा असून, भाजपाचा जाहिरनामा हा आमच्यासाठी वचननामा आहे, असे यावेळी भाजपाने वचननाम्यातून सांगितले आहे.कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपा उपाध्यक्ष माधव भंडारीजी, उपाध्यक्षा चित्राताई वाघ, हर्षवर्धन पाटील, जिल्हा अध्यक्ष समरजीत राजे, राहुल चिकोडे, शौमिका महाडिक, भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाने आजपर्यंत कोल्हापूरच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबाबत वचननाम्यामध्ये सांगण्यात आले असून, यात प्रामुख्याने पाणीपुरवठा आणि ड्रेनेजसाठी अमृतनिधी योजनेस भाजपाने निधी दिला. त्यासोबतच शहरांतर्गत विकासकामांसाठी १०० कोटी, सीपीआर आणि शासकीय महाविद्यालयासाठी १०० कोटी, चित्रनगरी, शास्त्रीनगर ग्राऊंडसाठी तीन कोटी, शहरातील केबल्स भूमिगत करण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी, एमएनजीएल अंतर्गत पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा आदी दिल्याचे सांगण्यात आले आहे.
त्याबरोबरच आगामी काळात कोल्हापुरच्या सर्वांगिण विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट देखील वचननाम्यातून मांडण्यात आले आहे. या प्रामुख्याने तरुण-तरुणींच्या आत्मनिर्भर वाटचालीसाठी विशेष प्रयत्न, महिला सबलिकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, पर्यावरण स्नेही कोल्हापूरसाठी विशेष प्रयत्न, कला, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासावर भर, सदृढ व निरोगी कोल्हापूर साठी विशेष प्रयत्न यावर भर देण्यात आला आहे.
त्यासोबतच शहरातील सर्व मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड बनवून देणे, शहरातील रस्ते नव्या अर्बन डिझाईन गाईडलाईन्सनुसार होण्यासाठी प्रयत्न, शहरातील सर्व प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, बांधकाम व्यवसायिक आणि वैयक्तिक घरांचे बांधकाम करणाऱ्यांचा त्रास वाचविण्यासाठी एक खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न, विविध समाजघटकांसाठी बहुउद्देशीय सभागृहांची उभारणी, ट्रेजरी कार्यालयानजिक मुलांसाठी खेळण्यासाठी मैदाने विकसित करणे, परमाळे सायकल ते रवी बॅंक येथील फेरीवाल्यांचे पुनर्वसन, यादवनगर भागात स्वच्छतागृहांचा विकास, बिंदू चौक व महालक्ष्मी मंदिर परिसरात बायोटॉयलेट विकसित करणे, उद्यमनगर परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.