सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणित सुधारणार महाराष्ट्र शासनाची खान अकॅडमीसह भागीदारी
कोल्हापूर, दि. ८ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विषय सोपा व सोयीस्कर व्हावा यासाठी नव्या पद्धतीने गणित उपक्रमाची सुरुवात केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १-१० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणित विषय सुधारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे मराठी भाषेत गुणवत्तापूर्ण गणित साहित्य उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च्या भाषेत विषय समजवून घेणे सोपे झाले. महाराष्ट्राच्या ४८८ मॉडेल स्कूलमध्ये पहिल्या टप्प्यात हा नवीन गणित अभ्यास साहित्य तसेच अत्याधुनिक ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात शिक्षणमंत्री, महाराष्ट्र शासन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते नुकताच करण्यात आली.
या उपक्रमाविषयी बोलताना शिक्षण विभाग आयुक्त, विशाल सोलंकी म्हणाले की, “आमची खान अकॅडमी समवेतच्या भागीदारीचे उद्दिष्ट हे आमच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्रज्ञान-क्षम सुविधेमार्फत जागतिक दर्जाचे अभ्यास साहित्य उपलब्ध करून सर्वोत्तम शिक्षणविषयक पायाभूत सुविधा देण्याचे आहे.
त्याशिवाय एससीईआरटी संचालक, देवेंद्र सिंग म्हणाले की, “एससीईआरटी महाराष्ट्र संकेतस्थळावर नवीन गणित अभ्यास साहित्य उपलब्ध होणार असल्याचा आनंद वाटतो. सोबतच खान अकॅडमीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मोफत उपलब्ध होईल.”
महाराष्ट्र शासन आणि खान अकॅडमी इंडिया २०२१ पासून खान अकॅडमीच्या गुणवत्तापूर्ण मॅथ साहित्यावर काम करत असून ७००+ व्हीडिओ लेख आणि सराव अभ्यास साहित्यांची पुनर्निर्मिती करून खान अकॅडमी समवेत एससीईआरटी महाराष्ट्रच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचे २००० हून अधिक शिक्षक, ३६ जिल्हा गट अधिकारी आणि ४८८ प्राचार्यांसमवेत काम करून त्यांना शिक्षण पुरवते आहे