विकासाला चालना देणारा सर्व समावेशक अर्थसंकल्प : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापू /प्रतिनिधी : मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री नाम.मा.श्री.अजितदादा पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे कमी झालेल्या विकासाच्या गतीला चालना देणारा सर्व समावेशक अर्थसंकल्प असून, या अर्थसंकल्पाद्वारे राज्यातील सर्वच घटकांच्या कामांना प्राधान्य देणारा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.ते पुढे म्हणाले कि, कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग या पंचसूत्रीसह पर्यटन, ऐतिहासिक वास्तू संवर्धन, विविध करात सवलत, स्वयंरोजगार निर्मिती याद्वारे राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचाविणारा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना रु.५० हजार अनुदान, भूविकास बँकेच्या ३४ हजार कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी सिंचन योजनेत शेततळ्याचा समावेश करून वाढीव अनुदान, कृषी निर्यात धोरण आखणारे देशातील पहिले राज्य, दोन वर्षात १०४ सिंचन प्रकल्प आदी शेती विषयक भरघोस तरतुदीमुळे शेतीप्रधान कामांना चालना मिळून शेतकऱ्यांचे हित जपले जाणार आहे. कृषी, आरोग्य, पर्यटन, दळणवळण, शिक्षण, महिला सबलीकरणासह सर्वच समावेशक बाबींची अर्थसंकल्पात बारकाईने दखल घेण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी दुसऱ्या टप्यात रु.२५ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १०० खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. कोल्हापूर विमानतळासाठी निधीची तरतूद केली आहे.
विशेषतः राजर्षी शाहू महाराजांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी निमित्त हे वर्ष “कृतज्ञता पर्व” म्हणून साजरे करण्यात येणार असून, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासह ऐतिहासिक गडकोट किल्ले, स्मारक संवर्धनासाठी ठोस निधीची तरतूद, मराठी भाषेच्या संशोधन, संवर्धनाकरिता “मराठी भाषा भवन”, छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना आदी महत्वाच्या बाबींसह रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीवरही या अर्थसंकल्पाद्वारे भर देण्यात आला आहे. राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नाम.मा.श्री.अजितदादा पवार यांना आढावा बैठकींचा अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालातील सुचविलेल्या उपाययोजनाचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री नाम.मा.श्री.अजितदादा पवार यांचे विशेष आभारही श्री.क्षीरसागर यांनी मानले.