राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बनावट मद्य निर्मिती कारखान्यावर छापा,४ लाख १४ हजार ५८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने उचगांव मणेरमळा परिसरातील बनावट मद्य निर्मिती कारखान्यावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ लाख १४ हजार ५८ रुपये किंमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उचगांव मणेरमळा परिसरात एका घरात अवैध बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी मणेरमळा येथे बनावट देशी विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. रोहित तमायचे आणि मनोज घमंडे (रा.दोघेही गोकुळ शिरगाव परिसर) तर यातील आणखी एक संशयित पसार झाला आहे. भरारी पथकाने या ठिकाणाहून पाण्याची मोटर, इसेन्स पॅकिंग टेप, बॅरल असा बनावट देशी विदेशी मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल, साहित्य आणि दोन मोबाईल संच असा सुमारे ४ लाख १४ हजार ५८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे उप अधीक्षक राजाराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी बर्गे, जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, विजय नाईक, बबन पाटील, सचिन काळेल, सागर शिंदे, मारुती पवार, राजू कोळी, सचिन लोंढे, जय शिनगारे, राहुल संगपाळ, साजिद मुल्ला आणि सहकार्याने मिळून केली.