बांधकाम कामगाराचं स्वप्न पूर्ण करण्यास कटिबद्ध – आम. ऋतुराज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रत्येकाच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगारांचे स्वप्न पूर्ण करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. ‘वहिनी मंच’ तर्फे आयोजित बांधकाम कामगाराना कार्ड व सुरक्षा साहित्य पेटी वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ४०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य किट प्रदान करण्यात आले.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबईच्या वतीने बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या कार्ड व पेटी वाटपाचा कार्यक्रम मार्केट यार्ड मधील जोतिबा हॉटेल येथे पार पडला. ‘वहिनी मंच’ आणि ‘युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौन्सिल’ शहर अध्यक्षा किरण तहसीलदार यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महेश वारके यांनी प्रास्ताविकामध्ये योजनेची माहिती व मिळणारे लाभ याविषयी माहिती दिली. यावेळी एकूण ७०० कामगारांपैकी ४०० बांधकाम कामगारांना आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सुरक्षा साहित्य किट असणाऱ्या पेटीचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी मागील दोन वर्षाच्या काळात कोरोनामुळे काम करण्यावर मर्यादा येत होत्या, पण आता कामाला गती मिळाली असून भविष्यात महाविकास आघाडी कडून सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात येतील. बांधकाम कामगारांनी सुरक्षतेला अधिक प्राध्यान्य दिले पाहिजे. या योजनेच्या माध्यमातून शिक्षण, विमा, आरोग्य याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. प्रत्येकाच्या घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम कामगाराचं स्वप्न पूर्ण करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याबद्दल वहिनी मंचचे कौतुक करत त्यांनी अभिनंदन केले.
सौ. किरण तहसीलदार यांनी या पुढेही अशा लोकल्याणकारी उपक्रमाच्या माध्यमातून सेवा करत राहू अशी ग्वाही दिली. यावेळी आयोजित नेत्र तपासणी शिबीराचाही अनेकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र डकरे, संजय पोवार -वाईकर, सागर तहसीलदार, जैद मुजावर, सचिन शेंडे, सई तहसीलदार, लतिका तहसीलदार, शिवाजी जाधव, उज्वला फडतारे आदींसह बांधकाम कामगार, भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.