जयप्रभा स्टुडीओच्या जागेसंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे कोल्हापूर महानगरपालिकेस नगरविकास विभागाचे आदेश – श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मागणीस शासन सकारात्मक
कोल्हापूर/प्रतिनिधी: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांची भेट घेवून जयप्रभा स्टुडीओच्या खरेदीदारांना पर्यायी जागा देवून स्टुडीओची जागा शासनाच्या ताब्यात घेवून विकसित करावी, अशी मागणी केली होती. याबाबत मंत्री नाम.श्री.एकनाथजी शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना तपासून सादर करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर आज दि.२१ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी श्री.रश्मीकांत इंगोले यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पत्राच्या अनुषंगाने तातडीने अहवाल सादर करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहे.
या लेखी पत्राद्वारे अहवाल मागविताना, सदर जागा भारतरत्न कै.लता मंगेशकर यांच्या मालकीची असून, त्यामधील निम्मी जागा त्यांनी काही वर्षांपूर्वीच विकली असून, उर्वरित जागा श्री.महालक्ष्मी स्टुडीओज एल.एल.पी. या फर्मने कायदेशीररित्या खरेदी केली आहे. कै.लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांचे स्मारक बांधण्यात यावे तसेच ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, अशा जनभावना असल्यामुळे सदर जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा दिल्यास स्टुडीओची जागा शासनास हस्तांतरित करण्यास फर्मने सहमती दर्शविली आहे. याप्रकरणी मागणीही त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडे केली आहे. याबाबत श्री.राजेश क्षीरसागर यांनी दि.१२ फेब्रुवारी रोजीच्या पत्रानुसार जागा हस्तांतरित करण्याविषयी नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे मागणी केली आहे.एकंदरीतच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने नगरविकास मंत्री महोदय सकारात्मक असून, नगरविकास विभागाने तातडीने सकारात्मक भूमिका घेतली आहे.