Friday, September 20, 2024
Home ताज्या किल्ले शिवनेरीवर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

किल्ले शिवनेरीवर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

किल्ले शिवनेरीवर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी गड-किल्ल्यांचा विकास –उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे/प्रतिनिधी :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव  उत्साहात साजरा झाला, त्यावेळी श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके,  मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष होते. त्यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन केलं. महाराजांसारख्या युगापुरुषाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. ४०० वर्षानंतरही शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीच्या मनात आदर आणि अभिमान कायम आहे. महाराजांच्या नावाने प्रत्येक पिढीला शौर्याची आणि जनकल्याणाची प्रेरणा दिली आहे.
छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाची भूमिका असून यासाठी पुरातत्व, पर्यावरण, वन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून जुन्या बांधकाम रचनेला धक्का न लावता या वारसास्थळांचे जतन करण्यात येईल. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवनेरी किल्ले संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून किल्ल्याच्या परिसरात विकास कामे सुरू आहेत. किल्ले रायगड  संवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून अनेक विकासकामे तेथे सुरू आहेत.
शिवजयंती ही मराठी माणसांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे किल्ल्यावर काही बंधनात जयंती साजरी करावी लागली. कोरोनाचे सावट कमी झाल्यावर सर्व निर्बंध खुले करण्याबाबत विचार केला जाईल. शिवाजी महाराजांनी जुन्नर येथील हापूस आंबा जपला. या आंब्याचे जतन करण्याचे काम सुमारे साडेतीनशे वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी केले. त्याला भौगोलिक मानांकन (जी.आय.) मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून प्रयत्न केले जातील.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही कायमच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र घटनात्मक तरतुदीमुळे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेता येणार नाही ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी प्रधानमंत्री महोदयांचीही भेट घेऊन कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत विनंती केली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्माच्या, पंथाच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं, त्यांचा तो वारसा सर्वांना सोबत घेवून पुढे जायचं आहे. कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी उपमुख्यमंत्र्यांनी वाहीली.
भारतीय डाक विभागाने केलेल्या ‘जुन्नर रत्न’ या पोस्टकार्ड संचाचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. १५ सचित्र पोस्ट कार्डाच्या या संचात येथील किल्ले, जैवविविधता, पर्यटन स्थळे, मंदिरे आदींचा समावेश आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांची संकल्पना यामागे होती. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार स्व. अनिल अवचट यांना जाहीर झाला होता तो त्यांची कन्या मुक्ता पुणतांबेकर यांनी स्वीकारला. तसेच शिवनेर भूषण पुरस्कार प्रा. विनायक खोत यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, माजी जि.प. अध्यक्ष देवराम लांडे, मराठा सेवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबे, यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments