कष्टकरी कामगारांचा परिपूर्ण विकास हाच आमचा ध्यास: आ. ऋतुराज पाटील बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप
कोल्हापूर/प्रतिनिधी : बांधकाम कामगारांच्या कल्याणाचा शब्द महाविकास आघाडी सरकारने दिला होता. तो पूर्ण केला असून, कष्टकरी कामगारांचा परिपूर्ण विकास हाच आमचा ध्यास असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने, बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४२ बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून बांधकाम कामगारांचा परिपूर्ण विकास हाच आमचा ध्यास असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकारने कामगार कल्याणाचा शब्द दिला होता, तो पूर्ण केला आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघातील ८०० बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असून आज पहिल्या टप्प्यात ४२ कामगारांना साहित्याच वाटप केल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
बांधकाम कामगारासाठी अनेक विविध योजना असून कामगारांनी त्याची माहिती जाणून घ्यावी. आपली सुरक्षितता महत्वाची असून काम करताना बांधकाम कामगारांनी सुरक्षा किट वापरावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी इंनफिनिटी कंपनीचे शोएब शेख यांनी कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते सात्ताप्पा कांबळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमावेळी इंनफिनिटी कंपनीचे जैद मुजावर, जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील, डी.वाय.पाटील कारखान्याचे संचालक तानाजी लांडगे, बी. आर. मालप, प्राचार्य डॉ.महादेव नरके, प्रणव चव्हाण आदी उपस्थित होते.