हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त डेकोरेटिव्ह रोडचा उद्या २३ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभ
जागर शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा ध्यास ८० टक्के समाजकारणाचा
कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम हिंदू, मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. आजही प्रत्त्येक शिवसैनिकाने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची मशाल तेवत ठेवली आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दि.२३ जानेवारी २०२२ रोजी जयंतीनिमित्त सामाजिक कार्याचा वसा जपला जातो. शिवसेनाप्रमुखांच्या ९६ व्या जयंती निमित्त शहर शिवसेनेच्यावतीने पापाची तिकटी ते शहीद भगतसिंग चौक, जुना बुधवार पेठ या रु.७२ लाखांच्या डेकोरेटिव्ह रोडचा उद्घाटन समारंभ यासह विविध सामाजिक उपक्रम आयोजित केल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला आणि शहरातील प्रमुख वर्दळीचा मार्ग असलेल्या पापाची तिकटी ते शहीद भगतसिंग चौक, जुना बुधवार पेठ या रस्त्याचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शहरातील या प्रमुख रस्त्याच्या कामाकरिता रु.७२ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील इतर रस्त्यांकरिता हा रस्ता रोल मॉडेल असणार आहे. या संपूर्ण रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करणेत येणार आहे. यासह रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टे, सेंटर पट्टे, रिफ्लेक्टर याद्वारे वाहतुक सुरक्षित करण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोगोनल पोल, डेकोरेटिव्ह पोल, ठिकठिकाणी हायमास्ट लॅम्प या विद्युत रोषणाईने रस्त्या उजळणार आहे. या रस्त्याचे उद्घाटन दि.२३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता “पापाची तिकटी, कोल्हापूर” येथे पार पडणार आहे.
यासह सीपीआर रुग्णालय येथे नवजात हृदय रोग असणाऱ्या ० ते १८ वर्षातील मुलांची अद्ययावत मशिनरीद्वारे मोफत 2डी इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास एम.आर.सी.सी. नारायणा हेल्थ केअर या नामाकिंत रुग्णालयाचे डॉ.सुप्रमित सेन व त्याचे वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे. या शिबिराद्वारे तपासणी होवून हृदय शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या मुलांवर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. हे शिबीर दि.२३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० या वेळेत “सी.पी.आर.रुग्णालय, कोल्हापूर” येथे आयोजित करण्यात आले आहे.
यासह कोव्हीड १९ च्या तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर शासनाने १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींची लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शिवसेनेच्या वतीने शहरातील ९ ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींचे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काशिलिंग विश्वेश्वर मंदिर कसबा बावडा, उभा मारुती चौक पोलीस चौकी शिवाजी पेठ, खोलखंडोबा हॉल शनिवार पेठ, महाराणी ताराराणी विद्यालय मंगळवार पेठ, सदर बझार हौसिंग सोसायटी को.म.न.पा. हॉल, रमाबाई आंबेडकर शाळा उत्तरेश्वर पेठ, जगदाळे हॉल राजारामपुरी, शेलाजी वनाजी शाळा लक्ष्मीपुरी, आदर्श विद्यामंदिर बापट कॅम्प या शहरातील ९ ठिकाणी हे मोफत लसीकरण शिबीर दि.२३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० या वेळेत पार पडणार आहे. यासह माजी नगरसेवक श्री.रविकिरण इंगवले यांच्यावतीने शहरातील नागरिकांसाठी मोफत कोविड १९ लसीकरणाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राकरिता रु.३५ इतका खर्च असून, श्री.रविकिरण इंगवले यांच्या माध्यमातून निशुल्क प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. दि.२३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता “शिवसेना संपर्क कार्यालय, खरी कॉर्नर, कोल्हापूर” येथे हा उपक्रम पार पडणार आहे.
यासह शहरात शिवसेना विभाग यादवनगर यांच्या वतीने न्यू क्रांन्ती तरूण मंडळ, यादव नगर आणि शिवसेना विभाग मुक्तसैनिक वसाहत यांच्या वतीने त्र्यंबोली मंदिर, मुक्त सैनिक उद्यान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना विभाग कसबा बावडा यांच्या वतीने शिवनेरी विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे ई- श्रमिक कार्ड नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासह शिवसेना शाखा जयभवानी गल्ली, कसबा बावडा यांच्या वतीने रेशनकार्ड नूतनीकरण, दुरुस्ती मोहीम राबविण्यात येणार आहे. वरील सर्व सामाजिक उपक्रमांचा लाभ गरजवंतानी घ्यावा. तसेच शहरातील तमाम शिवसेना शाखा व शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी, असे आवाहनही श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.