चुरशीने झालेल्या कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीची उद्या शुक्रवारी रमणमळा येथे मतमोजणी – प्रशासनाची तयारी पूर्ण
कोल्हापूर /प्रतिनिधी : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. आता लक्ष लागून आहे ते निवडणुकीच्या मतमोजणीत कडे. उद्या शुक्रवारी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण ४० टेबलवरती मतमोजणी होणार असून, दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणीचा पूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे. मतमोजणीची जी आवश्यक ती सर्व तयारी देखील पूर्ण झाली आहे. एकूण १५ जागासाठी ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीसाठी सुमारे २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्याचे आज प्रशिक्षण देखील पार पडले. संस्था गटात ६७ ते २४४ इतके मतदार आहेत. यामुळे पहिला निकाल सेवा गटाचा लागेल. त्यानंतर पणन आणि प्रक्रिया गटातील ४४८ मतांची मोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली आहे.मतमोजणीच्या ठिकाणी केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी असणार आहे. मतमोजणी केंद्रासह तालुक्याच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरोनामुळे विजयी मिरवणुका जल्लोष आदीवर बंदी घालण्यात आली असून हुल्लडबाजी तसेच गाडीची पुंगळी काढणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मुळातच प्रचंड इर्षेने जिल्हा बँकेसाठी मतदान झाले आहे. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.