पृथ्वीराज चव्हाण हे जनतेच्या मनातील भगीरथ – चेतना सिन्हा
कराड दक्षिण काँग्रेस कमिटी व सत्यजित पतसंस्था च्या वतीने महिला मेळावा संपन्न
कराड /प्रतिनिधी : माण तालुका अत्यंत दुष्काळग्रस्त भाग या भागात पाणी येईल असे कधी कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. या भूमीत माणगंगा नदी असूनही कायम कोरडी असणारी नदी प्रवाहित करण्याचे काम त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यामुळेच पृथ्वीराज चव्हाण हे आम्हा जनतेच्या मनातील “भगीरथ” च आहेत असे गौरवोद्गार माणदेशी उद्योग समूहाच्या संस्थापिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांनी आज काढले, त्या कराड येथे सत्यजित पतसंस्था व कराड दक्षिण काँग्रेस कमिटी च्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रसिद्ध व्याख्याता राणी पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, जि प सदस्या मंगला गलांडे, माजी जि प सदस्या विद्याताई थोरवडे, अर्चना पाटील, मीनाक्षी मारुलकर, उत्तमराव पाटील, विद्या मोरे, बानुबी सय्यद, राजेंद्र यादव (आबा), आदींसह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
यापुढे सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा म्हणाल्या कि, प्रत्येक दुष्काळात माण तालुक्यात चारा छावण्या उघडल्या जातच होत्या या चारा छावण्यांना फक्त भेट देणे आणि दुष्काळग्रस्तांच्या भावना समजून घेणे फार वेगळी गोष्ट आहे. दुष्काळग्रस्तांच्या भावना तेच समजून घेऊ शकतात जो मनातून शेतकरी आहे यामुळेच त्यावेळी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळग्रस्तांची मने जाणून घेतली व पूर्ण दुष्काळ छावण्यांची पाहणी केली आणि त्यावर उपाय सुचवून निधी सुद्धा उपलब्ध केला. अत्यंत संवेदनशील मन असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी माणगंगा नदी प्रवाहित केली यासाठी त्यांनी त्या भागात उभारलेले साखळी बंधारे आजहि कार्यान्वित आहेत. तसेच त्या पुढे म्हणाल्या कि, महिलांचे सक्षमीकरण हेच माणदेशी फाउंडेशन चा उद्देश असल्याने त्यानुसारच संस्था कार्यरत आहे. आजच्या युगात महिलांना डिजिटल ज्ञान मिळण्यासाठी जवळपास १ लाख ग्रामीण भागातील महिलांना संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, माणदेशी फाउंडेशनचे महिला सक्षमीकरणाचे काम अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. महिला सक्षमीकरण हा शासनासाठी महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पहिले महिला धोरण मांडले त्यानंतर २००१ साली स्व विलासराव देशमुख यांनी दुसरे महिला धोरण मांडले व त्यानंतर तिसरे महिला धोरण २०१४ साली मी मुख्यमंत्री असताना मांडण्यात आले. या धोरणांमुळे उद्दिष्टे जरी मांडली जात असली तरी त्याचे ग्रामपंचायत पर्यंत अंमलबजावणी होते का ? तसेच आज खरंच महिलांना समानतेची वागणूक दिली जात आहे का? घरातील सर्व कामे न चुकता करणारी गृहिणी तिच्या कामाचे मूल्य तिला कधी मिळणार आहे का ? असे अनेक प्रश्न महिला सबलीकरणात येतात.महिलांना ५०% आरक्षण जरी दिले गेले असले तरी ते अधिकार नक्की काय आहेत ते प्रशिक्षण महिलांना दिल्याशिवाय समजणार नाही. समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. १८ व्या शतकात स्त्री शिक्षणाची बीज पेरणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिला सक्षमीकरणाकडे पहिले पाऊल होते. या कार्यक्रमाचे आभार कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी मानले.