उद्योजक फुटबॉलपटू आमदार चंद्रकांत जाधव यांना नेत्यांकडून श्रद्धांजली
कार्यतत्पर आणि मनमिळावू सहकारी गमावला काँग्रेस आमदार चंदक्रांत जाधव यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची श्रद्धांजली
मुंबई : विधिमंडळातील व काँग्रेस पक्षातील सहकारी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी असून आपण एक कार्यतत्पर आणि मनमिळावू सहकारी गमावला आहे, अशा शोकभावना विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून थोरात म्हणाले की, अत्यंत, शांत, संयमी, मनमिळावू स्वभाव असणारे चंद्रकांत जाधव कायम कोल्हापूरच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत होते. कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली आणि त्यांची प्रकृती खालावत गेली. उद्योगांच्या अनेक समस्या त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करून सोडवल्या. कोल्हापूर शहराच्या विकासाबाबत ते कायम आग्रही होते. एक यशस्वी उद्योजक ते लोकप्रिय प्रतिनिधी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आम्ही जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे थोरात म्हणाले.
“कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही महाविकास आघाडीची मोठी हानी आहे. मी आणि आम्ही सर्वजण जाधव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. दिवंगत चंद्रकांत जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली…”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली….
शोक संदेश
आमदार चंद्रकांत जाधव हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उद्योग क्षेत्रात प्रगती केली. एक तरुण उद्योजक या क्षेत्रात कसा यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. उद्योगासोबत ते राजकारणात व समाजकारणात यशस्वी झाले. त्यांना पाच वर्षे काम करण्याची संधी मिळाली असती तर कोल्हापूरच्या विकासात चांगली भर पडली असती. त्यांचे सर्व क्षेत्रात अगदी बारकाईने व अभ्यास पूर्ण लक्ष होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या कुटुंबियांच्यावर कोसळलेल्या दुःखात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सहभागी आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ