जिल्ह्याला ओमायक्रॉन विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी यांची माहिती
ओमायक्रॉनला थोपवण्यासाठी शासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर काम करावे
आवश्यक ती पथके स्थापन करुन तात्काळ कार्यान्वित करा
परदेशातून व परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची माहिती घ्या
कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोर पालन करावे
मास्क विषयी जनजागृती करा
मंगल कार्यालय, हॉटेल मालकांना मर्यादित संख्येबाबत सूचना द्या
नागरिकांनी घाबरु नये, खबरदारी घेण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि.३० डिसेंबर (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्याला ओमायक्रॉन विषाणूपासून दूर ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेने प्रतिबंधात्मक आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करणे, गडहिंग्लज, चंदगड, कागलसह परराज्यातून येणाऱ्या मार्गावर जिल्ह्याच्या सीमाभागात चेकपोस्ट उभारणे, परदेशातून व परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी, संस्थात्मक विलगीकरण यासाठी आवश्यक ती पथके स्थापन करुन तात्काळ कार्यान्वित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलीस विभागासह विविध विभागप्रमुखांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, विधी अधिकारी वैभव इनामदार प्रत्यक्ष उपस्थित होते.कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे. ओमायक्रॉन विषाणूला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. १८ वर्षावरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्जिकल ट्रिपल लेअर अथवा एन ९५ या प्रकारातील मास्क वापण्याबाबत जनजागृती करावी. दुकानदार, खासगी आस्थापना छोटो-मोठे व्यावसायिकांनी दर्शनी भागात नियमावलीचा फलक ठळक अक्षरात लावावा. हॉटेल, मंगल कार्यालय, कार्यक्रम स्थळी उपस्थितांची संख्या नियमानुसार मर्यादीत राहण्यासाठी तसेच आवश्यक त्या उपाययोजनांचे पालन करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती विमानतळावर घेण्यात येत आहे. मात्र देशात इतर ठिकाणी उतरून रस्ते व रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांचीही माहिती ठेवावी, अशाही सूचना यावेळी श्री. रेखावार यांनी दिल्या.
कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोर पालन करुन कर्मचाऱ्यांकडूनही याचे पालन होत असल्याची खात्री करावी. ओमायक्रॉन विषाणूला नागरिकांनी घाबरु नये, पण कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करुन खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या विषाणूला थोपवण्यासाठी शासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर कामाला लागावे, असेही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले.