कोरोनामुक्तीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये जल्लोषी स्वागत,देव-देवतांसह महापुरुषांना अभिवादन : सडा रांगोळ्या व फुग्यांच्या जल्लोषासह फुलांचा वर्षावB
कोल्हापूर/कागल/प्रतिनिधी : कोरोनातून बरे होऊन आलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये आज जल्लोषी स्वागत झाले. गाडीतुन उतरताच मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामदैवत गैबी देवस्थानाचे दर्शन घेतले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतील श्री. दत्त मंदिर, हनुमान मंदिर, राम मंदिर, विठ्ठल- रुखुमाई मंदिर, श्री. गणपती मंदिर, श्री. साई मंदिर, श्री. लक्ष्मी देवी मंदिर असे दर्शन घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी बसस्थानकाजवळील अश्वारुढ छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
गैबी चौकात मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या समवेत लहान मुलांच्या हस्ते हवेत तिरंगी फुगे सोडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून रस्त्याच्या दुतर्फा उभारलेल्या माता-भगिनी व नागरिकानी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या गाडीवर फुलांचा अक्षरशः वर्षाव केला.यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या कुटुंबियांच्या वतीने गैबी देवस्थानाला गलेफ घालण्यात आला. तसेच अवधूत गोरे रा. तमनाकवाडा व संतोष कांबळे रा. सोनगे या दोघा युवकांनी बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून गैबी चौकापर्यंत दंडवत घातला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, पंचायत समिती सदस्य जयदीप पोवार, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, सौरभ पाटील, नितीन दिंडे, विवेक लोटे, आनंदा पसारे, सौ मंगल गुरव, संग्राम लाड, सौ. अलका मर्दाने, संजय चितारी आदी प्रमुख उपस्थित होते.
*देव तारी त्याला कोण मारी………*
मंत्री मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी गैबी चौकात नटून थटून मोठ्या उत्साहात आलेल्या चिमूकल्यांनी श्री. मुश्रीफ यांच्या समवेत हवेत रंगीबेरंगी फुगे सोडले आणि आनंदोत्सव साजरा केला. तसेच यावेळी या बाल सवंगड्यांनी देव तारी त्याला कोण मारी अशा घोषणाही दिल्या. चिमुकल्यांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले आणि मंत्री मुुश्रीफ गहिवरले.
*सडा रांगोळ्या आणि फुलांचा वर्षाव….*
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा व चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच मुख्य बाजारपेठेतील चौकांमध्ये नागरिकांच्या वतीने त्यांच्यासह गाडीवर फुलांचा वर्षाव होत होता.