विधान परिषदेसाठी भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवार निश्चित
कोल्हापूर/प्रतिनिधी : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येणाऱ्या दहा डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे महाविकास आघाडीकडून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव घोषित केले गेले आहे भाजपकडून मात्र अजून नावाची निश्चिती झाली नव्हती सात-आठ दिवस केवळ यावर चर्चा होत होती मात्र आज माजी आमदार अमल महाडिक यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले असून दिल्ली येथून या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टी कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत कोल्हापुरातून अमल महाडिक यांच्या नावाची निश्चिती केली गेली आहे. प्रथम त्यांची पत्नी सौ. शौमिका महाडिक यांचे नाव चर्चेत होते आज मात्र दिल्ली मधून अमल महाडिक यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल.राज्यामध्ये विधान परिषदेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. कोल्हापुरातून गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे विद्यमान आमदार असून महाविकास आघाडीतर्फे पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असणार याबद्दल गेल्या आठ दिवसापासून तर्कवितर्क सुरू होते. जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे आदी नावे भाजपकडून चर्चेत होती.निवडणुकीची घोषणा होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप पक्षाकडून उमेदवार दिला गेला नव्हता.
सोमवारी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची बैठक झाली. यामध्ये कोल्हापूर विधान परिषदेसाठी अमल महाडिक यांच्या नावाची निश्चिती करण्यात आली तसेच धुळे येथील जागेसाठी आमरिष पटेल यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज दिल्लीमधून होणार आहे असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात पाटील विरुद्ध महाडिक हा पारंपरिक सामना रंगणार आहे.