कोल्हापूर शहराची हद्दवाढ करणारच – आमदार चंद्रकांत जाधव
हद्दवाढीसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घ्यावा – हद्दवाढ कृती समिती
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन करणारच असा विश्वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.
हद्दवाढ समन्वय सर्वपक्षीय कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर शहराची रखडलेली हद्दवाढ करण्यासाठी शहराचे आमदार म्हणून आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घ्यावा असा आग्रह हद्दवाढ कृती समितीने यावेळी धरला.आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नावरील आंदोलनात मी सहभागी होतो. आंदोलनात मी सक्रिय सहभाग होतो, या वेळी असे लक्षात आले की शहराचे प्रश्न सोडवायचा असेल तर सत्तेत सहभाग पाहिजे. यामुळेच विधानसभेची निवडणूक लढवली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी आमदार झालो. यामुळे शहराची हद्दवाढ करणे ही माझी जबाबदारी आहे. शहराची हद्दवाढ करायचीच या अनुषंगाने सातत्याने प्रयत्नशील आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेच्या विविध विभागांच्या बैठका सुरू असून या बैठकीतून महापालिकेचे सर्व विभाग स्वयंपूर्ण परिपूर्ण झाले पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला सर्व मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. शहरांतल्या ज्या चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी आहेत त्या सर्वांच्या निदर्शनास आल्या पाहिजेत यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ रखडली आहे. प्रत्येकजण आपापला मतदारसंघ पाहतो. यामुळे शहराची हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे शहराचा अन् पर्यायाने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे, याकडे मात्र प्रत्येकजण सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहे .
शहर आणि ग्रामीणमधील मतदारसंघात असतानाही मतदारसंघात विकास साधता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ होय. यामुळे हद्दवाढीस विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधीनी कोणतीही भिती मनात ठेवू नये कारण हद्दवाढीनंतर मतदार व मतदारसंघ कायम राहणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगीतले.हद्दवाढीबाबत आता परिस्थिती बदललेली आहे. शहराच्या हद्दवाढीला कोणाचाही विरोध नाही. यामुळे पालकमंत्री सतेज पाटील, कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्रित घेऊन शहराच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. शहराची हद्दवाढ ही दोन टप्प्यांमध्ये करावी लागणार आहे. सुरुवातीस शहराची लोकसंख्या दहा लाखाच्या पुढे जाईल या अनुषंगाने गावांचा समावेश करून शहराच्या हद्दवाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
आर. के. पवार म्हणाले, की शहराची हद्दवाढ ही झालीच पाहिजे. आता नाही, तर कधीच नाही, अशी अवस्था होणार असल्याने हद्दवाढ काळाची गरज आहे. यामुळे हद्दवाढ करण्यासाठी शहराचे आमदार म्हणून आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घ्यावा.ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, की हद्दवाढीबाबत वाढीव गावासहीत फेरप्रस्ताव सादर करावा अशी भूमिका आमदार चंद्रकांत जाधव यांनी जाहिरपणे घेतली, याबद्दल समन्वय समितीच्यावतीने आमदार जाधव यांचे अभिनंदन.
हद्दवाढीला विरोध करणाऱ्याची समजूत काढण्यासाठी गावोगावचा दौरा करून चर्चा करावी.
हद्दवाढीला अडथळा असलेले असक्षम प्राधिकरण रद्द करण्यासाठी शासनाला पत्र द्यावे अशी मागणी दिलीप देसाई यांनी व्यक्त केली.हद्दवाढीला आता पर्याय नाही. त्यामुळे आधी हद्दवाढ नंतर निवडणूक अशी भूमिका कृती समितीने यावेळी मांडली.बाबा पार्टे, सुनील देसाई, सुभाष जाधव, दुर्गेश लिंग्रस, किशोर घाटगे, संजय जाधव, कमलाकर जगदाळे, श्रीकांत माने, विवेक कोरडे, चंद्रकांत बराले, अशोक भंडारे, सुनील पाटील, दिलीप देसाई, विजय शिंदे, अनूप पाटील आदी उपस्थित होते.