मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेत घोषणा
कोल्हापूर/प्रतिनिधी : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे याच पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कोल्हापुरात मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने सुरेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती.या परिषदेत मराठा आरक्षणासह विविध १५ ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान या गोलमेज परिषदेत पारित झालेल्या ठरावांचा गांभीर्याने विचार करुन सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा १० आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सुरेशदादा पाटील होते. या परिषदेस विजयसिंह महाडिक, भरत पाटील ,शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले ,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,सुजित चव्हाण, प्रसाद जाधव ,वंदनाताई मोरे,इतिहास तज्ञ नामदेव जाधव ,छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील यांच्या सह राज्यातील विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी,महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.
तर आरक्षणाच्यालढाईत बलिदान दिलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच मराठा आरक्षणासह विविध १५ ठरावावर चर्चा करून ते सर्वांमते मंजूर करण्यात आले.यावेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची लढाई लढण्याची तयारी दर्शवली.
यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी ,सारथी संस्थेच्या आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करावी,मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नोकरी भरती करु नये, मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, राज्यातील गडकिल्यांचे संवर्धन करण्यात यावे यासह विविध १५ ठराव मंजूर करण्यात आले.या गोलमेज परिषदेत पारित झालेल्या ठरावांचा गांभीर्याने विचार करुन सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा १० आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याचा इशारा सुरेशदादा पाटील यांनी दिला आहे.