कोरोनाबाधित पोलिसांसाठी ‘पोलीस फोन मित्र’ ही अभिनव संकल्पना
कोल्हापूर/प्रतिनिधी : जुगाड कौन्सिलिंग सेंटर कोल्हापूर आणि मनःसृष्टी, पुणे यांच्या संयुक्त माध्यमातून कोल्हापूर पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांसाठी “पोलीस फोन मित्र” ही एक अभिनव संकल्पना गेल्या दोन महिन्यापासून राबवण्यात येत आहेत. कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी किशोर काळे व प्रणील गिल्डे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. डॉ. कल्याणी कुलकर्णी, सुरेश खांडेकर, सुखदा आठले व सौ. गीता हसुरकर यांनी कोरोनाबाधित पोलिसांना या उपक्रमाअंतर्गत समुपदेशन दिले आहे.
‘सद्र रक्षणाय खल निग्रहणाय’ या ब्रीद वाक्याला अनुसरून कोरोनाच्या या कठीण कालावधीत योध्याप्रमाणे आपले कर्तव्य व सेवा संपूर्ण पोलिस दिवस-रात्र बजावत आहे. यात अनेक पोलिस कोरोनाबाधित झाले, तर काही जणांची प्रकृती चिंताजनक बनली. याचा त्रास त्यांच्या कुटुंबीयांना पण होत होता. याच वेळी पोलिसांना भावनिक व मानसिक आधार देण्याचे काम जुगाड व मन:सृष्टीचे निखिल वाळवगेकर व स्वप्नाली चाचड यांनी केले. कोरोनाबाधित पोलिसांची यादी घेऊन फोनवरून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम सुरू करण्यात आले. पोलीस मित्रांनीही याला चांगला प्रतिसाद देत मनमोकळेपणाने संवाद करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मनातील भीती व दडपण दूर होण्यास मदत झाली असे पोलीस मित्रांनी आपल्या अनुभवाद्वारे सांगितले.
ही संकल्पना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना आवडली. त्यांनी जातीने यात लक्ष घातले व यात सहभाग नोंदवला. या समुपदेशनामुळे पोलिसांना समाधान आणि जगण्याची उर्मी मिळाली आहे. त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढला आहे.