अच्युत गोडबोलेंचे माय लॉर्ड पहिल्यांदा ऑडिओ बुक मध्येप्रकाशित
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय न्याय व्यवस्था आणि कायदा या विषयावरील सुप्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले आणि अॅड.माधुरी काजवे यांनी लिहिलेले माय लॉर्ड हे पुस्तक स्टोरीटेल या स्वीडीशऑडिओ बुक अॅप वर पहिल्यांदा ऑडिओबुकस्वरूपात प्रकाशित झाले.
कोविड १९च्या लॉकडाऊन काळानंतर मराठी प्रकाशन क्षेत्रात घडणारा हा मोठा बदल आहे. नव्या जगात डिजिटलचे महत्व वाढत चालल्यामुळे मराठी लेखक आणि प्रकाशकही ईबुक्स आणि ऑडिओबुक्सच्या माध्यमाचा वापर करू लागले आहेत. २०१७ साली स्टोरीटेलने मराठी ऑडिओबुक्स अॅप भारतात आणले आणि अनेक मराठी लेखक ऑडिओबुक साठी लिहू लागले. अच्यूत गोडबोले हे मराठी साहित्यिकांमधील एक आघाडीचे नाव आहे. त्यांच्या मुसाफीर, किमयागार, अर्थाच, मनात, बोर्डरूम, कॅनव्हास सारख्या पुस्तकांनी विक्रीचे अनेक उच्चांक गाठले. ही सर्व पुस्तके स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत.
माय लॉर्ड हे नवे पुस्तक पहिल्यांदा ऑडिओबुकस्वरूपातप्रदर्शित करून नंतर छपाई स्वरूपात आणण्याचा पायंडा मराठीत पाडला जात आहे. माय लॉर्डमध्ये वकिली व न्यायव्यवस्था या विषयावरची खास अच्युत गोडबोले लेखनशैलीत रंजकपणे सांगितलेली सखोल माहिती आहे. अॅड.माधुरी काजवे यांच्यासह लिहिलेल्या पुस्तकात जागतिक पातळीवर न्यायव्यवस्था कशी उभी राहिली याचा आढावा घेताघेता जगातल्या सर्व महत्वाच्या देशांमधली न्यायवय्वस्था, वकिलांचे तसेच न्यायाधीशांचे किस्से, जगाचा दृष्टिकोन बदलणा-या किंवा कायदा बदलणा-या केसेस, भारतीय न्यायव्यवस्था व कायद्यांवर असलेला प्रभाव, तसेच भारतीय व जागतिक न्यायव्यवस्थेचा इतिहास, सर्वसामान्य माणसांना कोणते कायदे माहिती असायलाच हवेत याची माहिती आणि महत्वाच्या चित्रपट आणि पुस्तकांचे संदर्भ असे हे अतिशय रंजक पण सखोल ज्ञान देणारे पुस्तक आहे.
न्याय व्यवस्थेशी संबंधित वकील, न्यायाधीश, अशील, पक्षकार आदींना हे ऑडिओबुक उपयोगी आहेच पण सर्वसामान्य विद्यार्थी आणि वाचकांनाही महत्वाचे वाटेल व पुन्हा पुन्हा ऐकता येईल असे हे ऑडिओबुक झाले आहे. संदीप कर्णिक यांनी माय लॉर्डचेअभिवाचन केले आहे.