मंत्री हसन मुश्रीफ यांचे गडहिंग्लजला जल्लोषी स्वागत
परमेश्वराचे आशीर्वाद आणि जनतेच्या पाठबळामुळे मला काहीही होणार नाही
फुलांच्या वर्षावासह घोषणांच्या निनादाने दुमदुमले वातावरण
गडहिंग्लज/प्रतिनिधी : दर आठवड्याला गडहिंग्लजकरांसाठी एक दिवस हा मंत्री हसन मुश्रीफ यांचा परिपाठच जणू. परंतु; आजचा दिवस त्यांना अनपेक्षित होता. न्यायालयीन लढाई आणि आजारपणामुळे तब्बल एक महिन्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसाठी ते सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात येणार होते.
सकाळी अकरा वाजता त्यांचे गडहिंग्लज शहरात आगमन झाले. गडहिंग्लजकरानी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीने उत्स्फूर्त स्वागत केले. न्यायालयाच्या नवीन इमारतीपासून पक्ष कार्यालयापर्यंत रस्त्यावर फुले अंथरलेली होती. रस्त्याच्या दुतर्फा सडा- रांगोळ्या टाकलेल्या होत्या व फटाक्यांची जल्लोषी आतषबाजी होती. गाडीतून उतरताच उत्साही कार्यकर्त्यांनी त्याना खांद्यावर घेतले आणि मुश्रीफ यांच्या विजयाच्या घोषणाच्या निनादात ही मिरवणूक निघाली. मिरवणुकीच्यापुढे असलेल्या तोफेमधून मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यावर अखंडपणे फुलांचा वर्षाव होत होता. कार्यकर्त्यांनी खांद्यावरूनच अलगद त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात देऊन ठेवले. या अनपेक्षीत स्वागताने मंत्री मुश्रीफही भारावले.
कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, गेल्या तीस -पस्तीस वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात अनेक संघर्ष आले आणि गेले. मीही हे सगळे आघात सहजरीत्या झेललै आहेत. परमेश्वराचा आशीर्वाद आणि जनतेचे पाठबळ माझ्या पाठीशी असल्यामुळे मला काहीही होणार नाही. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर, माजी नगराध्यक्ष किरणआण्णा कदम, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष गुंडेराव पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, बड्याचीवाडी ग्रामपंचायत सदस्य रश्मीराज देसाई, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष शर्मिली पोतदार, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, गोडसाखरचे संचालक प्रकाशभाई पताडे, गोडसाखर संचालक अमरसिंह चव्हाण, नगरसेविका श्रीमती शुभदा पाटील, नगरसेविका रेश्मा कांबळे, रूपाली परीट, महिला कार्याध्यक्षा सुनीता नाईक, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष राजू जमादार, जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील, नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुरेशआण्णा कोळकी, राहुल शिरकोळे, प्रा. अशपाक मकानदार, रफिक पटेल, महेश गाढवे, प्रशांत शिंदे, अरविंद बारदेस्कर, रमजानभाई आत्तार, राजू दड्डी, शेंद्रीचे माजी सरपंच शिवाजी राऊत आदी प्रमुख उपस्थित होते.या प्रमुखांसह गडहिंग्लज शहर, कडगाव -गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघ व उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.