कीरीट सोमय्या यांनी कोल्हापूरची शांतता बिघडू नये,
नागरी कृती समितीचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ
यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करुन माजी खासदार कीरीट सोमय्या यांनी शांतताप्रिय कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये.
ज्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी देशाला समतेचा विचार देऊन अन्यायाविरुध्द लढण्याचा आदर्श घालून दिला त्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जनतेला चिथावणीखोर भाषा वापरुन कीरीट सोमय्या यांनी डिवचण्याचा प्रयत्न करु नये. निवडणूकीपुरते १५ दिवस राजकारण करुन बाकी पूर्ण वेळ पक्षभेद व जातीपातीच्या पलीकडे जाऊन अहोरात्र सामाजिक काम करणाऱ्या ना हसन मुश्रीफांवर आरोप करुन आपले स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करुन जनतेला भडकविण्याचे प्रयत्न सोमय्या करीत आहेत. कोल्हापूरात काही काळ प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनीही महागात पडेल वगैरे अशी भाषा न वापरता कीरीट सोमय्या यांना समजावून आपले कर्तव्य मानून कोल्हापूरात शांतता, सलोखा राखण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहेत. कायदा सर्वांना समान आहे. कायदेशीर तक्रारी करण्याचे सर्वांनाच अधिकार आहेत. त्याप्रमाणे सोमय्या यांनी रितसर तक्रारी जरुर कराव्यात. पण स्टंटबाजी करुन संस्थेला बिघडविण्याचे काम करु नये. केंद्रात असणाऱ्या आपल्या स्वत:च्या संबंधाचा वापर करुन महाराष्ट्राचे केंद्राकडे प्रलंबित जे प्रश्न आहेत ते सोडविण्याचा प्रयत्न करावा, जनता त्यांची सदैव ऋणी राहील. लॉकडाऊनमुळे जनता अगोदरच त्रस्त झाली आहे. त्यातच बाहेरुन येऊन जिल्हयामध्ये चिथावणीखोर भाषा न वापरता कायदेशीर मार्ग जरुर अवलंबावा. पण कोल्हापूरचे
वातावरण गढूळ होईल असे वर्तन करू नये अन्यथा कोल्हापूरच्या जनतेलाही तुमच्या मुंबईतील घरासमोर येऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असे आवाहन चंद्रकांत सुर्यवंशी अँड. रणजित गावडे, माणिक मंडलिक, अशोक पोवार, दादासो लाड, रमेश मोरे, बाबासो देवकर, चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, भाऊ घोडके, अजित सासने, कादर मलबारी, राजेश वरक, बाबा जामदार, मदन चोडणकर, फत्तेसिंह सावंत, महेश जाधव यांनी केले आहे.