राजाराम चौक मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला अटक
कोल्हापूर/प्रतिनिधी : गणेशोत्सव काळात राजाराम चौक मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुयश उर्फ अरुण महेश हुक्केरी (रा.राजाराम चौक) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीचे सुमारे ६४ हजार ९०७ रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. गणेशोत्सव काळात टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने १५ सप्टेंबर रोजी रात्री चोरीला गेले होते. याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. आज राजाराम चौक तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचे दागिने चोरणाऱ्या याच परिसरात राहणाऱ्या सुयश उर्फ अरुण हुक्केरी यांला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे ६४ हजार ९०७ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केलेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अजय गोडबोले, किशोर डोंगरे, विजय कारंडे, किरण गावडे, कुमार पोतद्दार, प्रदीप पवार, पांडुरंग पाटील यांनी मिळून केली आहे.