पावसामुळे कोसळलेले गरीब महिलेचे घर पुन्हा बांधून देत कृष्णराज महाडिक यांनी जपली सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर/प्रतिनिधी : ऊन, वारा, पावसापासून बचाव करत, उभे राहीलेले वर्षानुवर्षाचे जुने घर मुसळधार पावसामुळे कोसळले आणि अगोदरच दारिद्रयाच्या खाईत सापडलेल्या त्या माऊलीवर जणू आभाळच कोसळले. दोन खोल्यांचे घर, त्यात गुडघाभर चिखल, अर्ध छत कोसळलेले, उर्वरीत कधी कोसळेल याचा नेम नाही, अशा अवस्थेत हताश आणि निराश झालेल्या त्या माऊलीला आधार दिला तो कृष्णराज महाडिक यांनी. कोल्हापुरातील उजळाईवाडी जकात नाक्याजवळ राहणार्या मंगल कानडे या महिलेचं पावसामुळं कोसळलेलं घर पुन्हा बांधून देवून, महाडिक यांनी सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाची परंपरा कायम राखलीय.मागील महिन्यात आलेल्या जोरदार पावसाने अनेकांच्या घरादाराचे मोठे नुकसान झाले. कोटयवधी रूपयांचे नुकसान झाले. या तडाख्यात अनेक गोरगरीबही सापडले. कोल्हापुरातील उजळाईवाडी इथल्या शाहू जकात नाक्याजवळ राहणार्या मंगल कानडे या महिलेचे जेमतेम दोन खोल्यांचे जुने घर, मोलमजुरी करून, मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरणार्या मंंगल कानडे यांच्यावर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडयात जणू आकाश कोसळले. मुसळधार पावसामुळे कानडे यांच्या घराचे छत कोसळले आणि त्यांनी उभा केलेला किडूक मिडूक संसारही अक्षरशः पाण्यातून वाहून गेला. घरामध्ये गुडघाभर चिखल झाला, दारिद्रयाने अगोदरच पिचलेल्या कानडे यांच्या घराची दुर्दशा पाहून अनेकजण हळहळले. कानडे यांच्या डोळयातील अश्रुंच्या धाराही थांबत नव्हत्या. राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर जायचे कुठे, अशी म्हण त्यांच्या बाबतीत सत्य ठरली होती. घरात अन्नधान्याचा कण नाही, डोक्यावर छप्पर नाही, अशा अवस्थेत हताश झालेल्या मंगल कानडे यांच्या मदतीसाठी कृष्णराज महाडिक धावून गेले. त्यांनी स्वखर्चानं ८ दिवसात मंगल कानडे यांचे घर पुन्हा बांधून दिले आणि त्यांच्या हक्काचा निवारा त्यांच्याकडे सुपुर्द केला. नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमध्ये समाजाच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक घराण्याची परंपरा आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवत, समाजसेवेच्या कार्यात आणखी एक अध्याय यानिमित्ताने जोडला.