कोल्हापूर शहर लसीकरणात आघाडीवर
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्यावतीने जानेवारी २०२१ पासून कोवीड लसीकरण मोहिम सुरु केली आहे. आत्तापर्यंत २ लाख नागरीकांना पहिला डोस दिला आहे. यानुसार शहरातील ४५ टक्के नागरीकांना पहिला डोस देण्यात आला तर दुसरा डोस देण्याचे प्रमाण ६० टक्के इतके आहे. दुसरा डोसचे हे प्रमाण राज्यातील इतर शहराच्या तुलनेत चांगले आहे. महापालिकेचा या मोहिमेतून जास्तीत जास्त नागरीकांना पूर्ण संरक्षण देण्याचे प्रयत्न आहेत.
सद्यस्थितीमध्ये ४५ वर्षावरील सर्व नागरीकांना ऑन द स्पॉट लसीकरण महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर दिले जाते. तसेच दुसरा डोस ज्या नागरीकांचे ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांना सुध्दा ऑन द स्पॉट लसीकरण सर्व आरोग्य केंद्रावर दिले जात आहे. प्रत्येक दिवशी ५ हजार नागरीकांचे लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेमार्फत करण्यात आलेले आहे. तरी ४५ वर्षावरील ज्या नागरीकांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे. १८ ते ४५ वर्षातील नागरीकांनी ऑनलाईन स्लॉट बुक करुन लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. त्याचप्रमाणे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि गरोदर माता यांच्यासाठी प्रत्येक सोमवारी विशेष लसीकरण सत्र आयोजित केले जाते. तरी सर्व नागरीकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.
शहरात हेल्थ केअर वर्करसाठी १३६८८ उद्दीष्ट होते. त्यापैकी १३६८८ नागरीकांना पहिला डोस दिला आहे. तर ९५३४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १२०८४ फ्रंट लाईन वर्करांना लस देण्याचे उद्दीष्ट होते. त्यापैकी १२०८४ जणांना पहिला डोस तर ६६७२ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वर्षातील २८२०८८ नागरीकांना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ५६२११ नागरीकांना पहिला डोस तर ९६३२ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला. ४५ ते ५९ वर्षातील १०४३८३ नागरीकांना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ६२८८६ नागरीकांना पहिला डोस तर ४५४९२ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षावरील ७२२४२ नागरीकांना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ५९८६९ नागरीकांना पहिला डोस तर ४०१८ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शहरासाठी ४८८४६५ इतक्या नागरीकांचे उद्दीष्ट होते त्यापैकी २०४७३८ इतक्या नागरीकांना पहिला डोस तर १११४९८ इतक्या नागरीकांना दुसरा डोस दिला आहे. यामध्ये दुसऱ्या डोसचे प्रमाण इतर शहराच्या तुलनेत चांगले आहे.