केडीसीसी बँक पेन्शनधारक खातेदारांना देणार पाच लाखापर्यंत कर्ज- बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता पेन्शनर प्राथमिक शिक्षकांना पेन्शन पोटी पाच लाखापर्यंतचे कर्ज देणार आहे. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सेवानिवृत्त आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडे ही मागणी केली होती.याबाबत अधिक माहिती अशी, पेन्शनधारक प्राथमिक शिक्षकांची पेन्शन बँक खात्यावर जमा होण्यास विलंब झाला तर दर महिन्याच्या एक तारखेला सदर खात्यावर अधिकर्ष म्हणजेच ओवरड्राफ्ट मंजूर करण्याची सुविधा पेन्शनधारकांना दिली जाणार आहे.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव सखाराम पाटील, सरचिटणीस एम. बी. जाधव, कागल तालुकाध्यक्ष दस्तगीर वस्ताद, तालुका सरचिटणीस अशोक डवरी, संघटक तानाजी नलवडे, संघटक पी. बी. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
चौकट – सेवानिवृत्तांना दिलासा – अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सेवानिवृत्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव सखाराम पाटील म्हणाले, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शन जमा होण्यामध्ये कधीकधी वेळ लागत असतो. तसेच इतरही अनेक अडचणी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर बँकेने पेन्शनपोटी कर्ज देण्याच्या घेतलेल्या निर्णयासह पेन्शनवर अधिकर्ष म्हणजेच ओव्हर ड्राफ्ट गोष्टी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिलासादायक आहेत