इन्कम टॅक्स विभागाकडून गौरव हे सभासद शेतकऱ्यांचे योगदान – कार्यकारी समिती बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे गौरवपत्र व गौरवचिन्ह सुपूर्द
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत सरकारच्या इन्कम टॅक्स विभागाकडून केडीसीसी बँकेचा जास्त इन्कमटॅक्स भरल्याबद्दल झालेला गौरव हे सभासद शेतकऱ्यांचे योगदान आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बँकेच्या संचालक मंडळासह दोन लाख, ९० हजार शेतकरी, अकरा हजार सहकारी संस्था सभासद, ग्राहक, हितचिंतक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे सांघिक यश आहे, असेही ते म्हणाले.
भारत सरकारच्या इन्कमटॅक्स विभागाने सर्वात जास्त आयकर भरल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गौरवपत्र व गौरवचिन्ह पाठविले आहे. बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बँक प्रशासनाने हे गौरवपत्र सुपूर्द केले. बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बँक प्रशासनाच्यावतीने मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कारही झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या आर्थिक वर्षात केडीसीसी बँकेने १८ कोटी २२ लाख इतका सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरून बिगर कंपनी विभागात कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. “आजादी का अमृतमहोत्सव” या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला हे पारितोषिक मिळाले आहे. तसेच याच सालातील सर्वसाधारण विभागातील द्वितीय पारितोषिकही मिळाले आहे.
चौकट –
बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, २०१५ साली बँकेचे संचालक मंडळ कार्यरत झाले. संचालक मंडळाने काटकसरीने कारभार सुरू केला. सुरवातीचा १३७ कोटी रुपयांचा संचित तोटा पहिल्याच वर्षी भरून काढून दुसऱ्या वर्षापासून बँकेला निव्वळ नफा सुरू झाला. त्यानंतर बँकेने इन्कमटॅक्स भरण्यास सुरुवात केली. बँक अल्पावधीतच पूर्वपदावर येऊन अधिक सक्षम झाली. संचालक मंडळासह शेतकरी, संस्था, सभासद, ग्राहक, हितचिंतक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे सांघिक यश आहे.