हॉलमार्कमुळे सोने खरेदीमध्ये विश्वसनीयतेबरोबर
व्यवसाय वाढेल – चार्टर्ड अकौंटंट दीपेश गुंदेशा
कोल्हापूर/प्रतिनिधी : हॉलमार्क बंधनकारक केल्यामुळे सोने खरेदीमध्ये ग्राहकांची विश्वसनीयता वाढण्याबरोबरच सराफ व्यवसायही वाढेल, असा विश्वास चार्टर्ड अकौंटंट दीपेश गुंदेशा यांनी व्यक्त केला.येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने हॉलमार्क व एचयूआयडी या विषयावार मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयने १६ जून २०२१ पासून सोन्याचे सर्व दागिने हॉलमार्क करणे बंधनकारक केले आहे. ग्राहकांना शुद्ध सोने मिळावे आणि फसवणूक होऊ नये या हेतूने हा निर्णय भारतीय मानक संस्थेमार्फत राबवण्यात येत आहे. या निर्णयामुळे सोने खरेदीमध्ये ग्राहकांची विश्वसनीयता वाढणार असून याचा फायदा सराफ व्यवसाय वाढण्यासाठीही होणार आहे. परंतु या कायद्याच्या तरतुदी जाचक असून प्रक्रियाही अत्यंत क्लिष्ट आहे.
ते म्हणाले, या प्रक्रियेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक व्यावहारिक अडचणी आहेत. सराफ व्यावसायिक हॉलमार्क बंधनकारक करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत असले तरी एचयूआयडीसारख्या अव्यवहार्य संकल्पनेचा तीव्र विरोध करीत आहेत. त्यासाठी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याबरोबर वेळोवेळी भेटीच्या माध्यमातून सराफ व्यावसायिकांच्या संघटना यातील अव्यवहार्य गोष्टी हटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
यावेळी श्री. गुंदेशा यांनी हॉलमार्कबाबत कायद्याच्या दृष्टिकोनातून सविस्तर माहिती दिली, तर कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी व्यावहारिक अडचणी स्पष्ट केल्या. यावेळी उपस्थित सराफ व्यावसायिकांच्या शंकांचे समाधानही दोघांनी केले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे सचिव रवींद्र राठोड यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष जितेंद्र राठोड यांनी आभार मानले. शहरचे सचिव अनिल पोतदार, संचालक शिवाजी पाटील, संजय जैन, सुहास जाधव, प्रीतम ओसवाल, प्रसाद कालेकर, किशोर परमार, तेजस धडाम, जिल्हा सचिव माणिक जैन यांच्यासह सराफ व्यावसायिक उपस्थित होते.