कोल्हापूर शहरातील रस्ते विकास प्रकल्पाकरीता २०३. ८२ कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी
आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच पाठपुराव्यास यश : दोन टप्प्यात मिळणार निधी
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजना नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाकरीता दोन टप्प्यात २०३. ८२ कोटी रूपयांच्या निधीस आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली. हा निधी मंजूर करण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी सुरवातीपासून पाठपुरावा केला आहे, आज त्याला यश मिळाले.कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाबाबत मुंबईत आज मंत्रालयात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबीटकर , भूषण गगराणी (प्रधान सचिव नगरविकास-१), महेश पाठक (प्रधान सचिव नगरविकास-२),
पांडुरंग जाधव (सहसचिव नगरविकास) आदी उपस्थित होते. आमदार ऋतुराज पाटील, महानगरपालीकेचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच नागपूर अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्यावर रस्ते विकास प्रकल्पासाठी १७८.९७ कोटी रुपयांचा निधीची मागणी केलेली होती. त्यानंतर अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना कोल्हापूर रस्ते विकास प्रकल्पासाठी निधी मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर नगरविकास खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे प्रस्ताव आज मंजूरीसाठी आपणाकडे आला आहे. २०१९ व २०२१ च्या महापुरामुळे कोल्हापूर शहरातील रस्ते खराब झाले असून, रस्ते विकास प्रकल्पासाठी निधीस मंजूरी द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी यावेळी केली.कोल्हापूरातील रस्त्याचे प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यामुळे निधी कसा द्यायचा असा प्रश्न नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांनी उपस्थित केला.यावेळी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याची पूर्तता महानगरपालिका एक महिन्यात करेल अशी ग्वाही आमदार जाधव यांनी दिली. महापालिका आवश्यक त्या सर्व कागद पूर्तता करेल असे प्रशासक डॉ. कादबंरी बलकवडे यांनी सांगीतले.करवीर निवासीनी महालक्ष्मीला देशातून पर्यटक येतात. त्यामुळे रस्ते विकास प्रकल्पासाठी निधी द्यावा असा आग्रह आमदार जाधव, पालकमंत्री पाटील यांनी धरला.महापालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे रस्ते विकास प्रकल्पासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.महापालिकेकडून कामाची पूर्तता करून द्या, रस्ते विकास प्रकल्पासाठी २०३. ८२ कोटी रुपयांचा निधीस मंजूरी देतो. त्यासाठी दोन टप्प्यात प्रस्ताव करून, दोन टप्प्यास निधी देऊ असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.कोल्हापूरची महानगरपालिका ड वर्ग आहे. यामुळे रस्ते विकास प्रकल्पाच्या निधीतील २५ टक्के रक्कम महानगरपालीकेस भरावी लागते. कोरोनामुळे महानगरपालिका आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे २५ टक्के ऐवजी १० टक्के निधी महानगरपालीकेकडून घ्यावा अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.