आमदार चंद्रकांतदादा यांनी राष्ट्रवादी – महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सांभाळून बोलावे – राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली समज
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंड सांभाळून बोलावे. स्वतःचे हसे होणार नाही असे वर्तन करावे. लोक आपल्यावर टीका का करतात? याचेही स्वतः आत्मपरीक्षण दादांनी करावे.कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. पाटील यांना प्रसिद्धी पत्रकातून ही समज दिली आहे.
या पत्रकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आर के पवार, राजेश लाटकर, विनायक फाळके, आदिल फरास आदी प्रमुखांच्या सह्या आहेत.
पत्रकात पुढे म्हटले आहे, पश्चिम बंगाल राज्याच्या व पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री नामदार छगन भुजबळ साहेबांनी “मेरी झांशी मैं नही दूंगी” असे वक्तव्य करणाऱ्या झाशी की राणीची तुला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे बरोबर केली होती. “मेरा पश्चिम बंगाल मै नही दूंगी” या वक्तव्यावर “दादाको गुस्सा क्यूँ आया” ते म्हणाले. भुजबळ या एकेरी नावाने तुम्ही पंढरपूरवर बोला बंगालवर नको. तुम्ही जामिनावर सुटला आहात, निर्दोष सुटला नाही. हे याद राखा. हे वक्तव्य कशाचे द्योतक आहे?
मराठा आरक्षणाबाबत भा.ज.प. पक्षाने व तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाची कशाप्रकारे फसवणूक केली आहे. याचं वस्तुस्थितीवर आधारित पोस्टमार्टम केले होते. त्यावर बोलताना दादा म्हणाले, अशोक चव्हाण तुमची औकात ती काय ? औकातीत रहावे, हे कशाचे द्योतक आहे ?आमदार चंद्रकांतदादांनी सरकार झोपेत पडेल ? असे हास्यास्पद विधान केल्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले, हे विधान चंद्रकांतदादांनी झोपेत केले की जागेपणी केले? यावर दादा यांनी अजितदादाना मी फाटका माणूस आहे. तोंड उघडले की महागात पडेल ? असे विधान केले. हे कशाचे द्योतक आहे?
श्री. पाटील यांची ही सगळी वक्तव्ये म्हणजे हे अंगामध्ये आलेल्या गर्वाचेच द्योतक आहेत, असाच अर्थ निघतो. मग आमच्या नेत्यांनी कोणती चुकीची प्रतिक्रिया दिली? मराठीमधील योग्य शब्दांचाच वापर केला. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भान ठेवून बोलावे, त्यांचे हसे होणार नाही. तिखट प्रतिक्रियेला तोंड द्यावे लागणार नाही.दरम्यान, आमचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गेली दीड वर्ष कोरोनाच्या महामारीशी कोल्हापूर जिल्ह्यासह ते पालकमंत्री असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाशी जीवाची पर्वा न करता अहोरात्र संघर्ष करीत आहेत, असेही या पत्रकात पुढे म्हटले.