रिक्षा व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील – श्री.राजेश क्षीरसागर
रिक्षा व्यावसायिकांना मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थिती हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री नाम.मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने अनुदान जाहीर केले. राज्यातील सुमारे ७ लाख १५ हजार परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना प्रत्त्येकी रु.१५०० प्रमाणे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. सध्याच्या पॅकेज नुसार फक्त परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना याचा लाभ होणार आहे. रिक्षा व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांनी गोरगरीब जनतेचे दुख: जाणून त्यांना केलेल्या मदतीबाबत आभारी असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले आहे. रिक्षा व्यावसायिकांना शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदानाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आज सायंकाळी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, येथून सुरु करण्यात आली.यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, महाराष्ट्र राज्यात रिक्षा व्यावसायिकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. गतवर्षी पासुन कोरोना रोगामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात गोरगरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षाव्यावसायिकांच्या मदतीसाठी राज्य शासनाने ही मदत केली आहे.
रिक्षा व्यावसायिकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना व्हावी, अशी मागणी मी वेळोवेळी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार रिक्षा व्यावसायिकांना न्याय मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि रिक्षा व्यावसायिकांना न्याय देणारे उपक्रम राबविण्यात आले आहे. शहरातील सुमारे ३००० रिक्षा व्यावसायिकांना रिक्षा ई मीटर चे वाटप, रिक्षा व्यावसायिकांसाठी क्रिकेट स्पर्धा अशा माध्यमातून रिक्षा व्यावसायिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.सध्या राज्य शासनाने मंजूर केलेया अनुदानातून रिक्षा परवाना धारकांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा करता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत ऑनलाइन प्रणाली विकसित केली असून, याची सुरवात आज करण्यात आली आहे. शहरातील रिक्षा व्यावसायिकांची संख्या हजारोंच्या घरात असून, नोंदणी करिता परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांनी शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधून मोफत ऑनलाईन नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
परवानाधारक रिक्षा व्यावसायिकानी आपला आधार क्रमांक, वाहन क्रमांक, परमिट व लायसन्स क्रमांक याची माहिती शिवसेना शहर कार्यालय येथे सादर करावी. त्यानंतर रिक्षा चालकांच्या कागदपत्रांची खातरजमा करण्यात येईल. ती झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ठरवण्यात आलेली रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल.याप्रसंगी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे रमेश पोवार, विष्णुपंत पोवार, सुनील खेडेकर, राजू काझी, सुभाष पाटील, विक्रम पोवार, अल्लाउद्दिन नाकाडे, अशोक माने आदी उपस्थित होते.