अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी गहू व तांदळाचे मोफत वितरण – जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे
प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे व जून करीता प्रति लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ मोफत वितरण
कोरोना कालावधीतील शिल्लक राहिलेल्या मोफत तूरडाळ, चणाडाळ व हरभरा यांचे मोफत वितरण
मोफत शिवभोजन थाळीचा १ लाख ५१ हजार २५२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
सांगली/ (जि.मा.का.) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यांतर्गत अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असणाऱ्या अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना दिले जाणारे गहू व तांदूळ अनुक्रमे २ रुपये व ३ रुपये प्रति किलो अशी किंमत न आकारता एक महिना मोफत वितरीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना माहे मे चे धान्य मोफत मिळणार असून लाभार्थ्यांची एकूण २ कोटी ३१ लाख १२ हजार ५२ रूपयांची बचत होणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यामध्ये अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय योजनेच्या ३१ हजार ३२८ शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब योजनेच्या ३ लाख ७५ हजार ७९ अशा एकूण ४ लाख ६ हजार ४०७ शिधापत्रिका असून लाभार्थी संख्या १८ लाख ४७ हजार ४८० इतकी आहे. या शिधापत्रिका धारकांना माहे मे २०२१ या एक महिन्यासाठी प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे. तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांना एकूण ३५ किलो धान्य यामध्ये गहू २५ किलो व तांदूळ १० किलो मोफत वितरीत केला जाणार आहे. सदर मोफत धान्य हे e Pos व्दारे वितरीत करण्यात येणार आहे. माहे मे करीता लाभार्थ्यांना दिनांक १८ मे २०२१ अखेर ४ हजार १०३ मेट्रिक टन गहू व २ हजार ५९४ मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सांगितले.
कोविड १९ च्या अनुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजनेंतर्गत (PMGKAY III) अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ किलो धान्य माहे मे व जून करीता मोफत वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये प्रति लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. दिनांक १८ मे २०२१ अखेर एकूण १ हजार ३१ रास्त भाव दुकानांमध्ये मोफतचे धान्य पोहोच झाले असून सांगली जिल्ह्यातील एकूण १ लाख ७० हजार ८९५ शिधापत्रिकांना म्हणजेच ४२ टक्के लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सांगितले.
विविध योजनेअंतर्गत माहे एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये रेशनकार्डधारकांना तसेच विनाशिधापत्रिका धारकांना तूरडाळ, चणाडाळ व हरभरा मोफत वितरीत करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत शासकीय गोदामांमध्ये तसेच रास्त भाव दुकानांमध्ये काही प्रमाणात शिल्लक असलेल्या खाण्यास योग्य असलेल्या तूरडाळ, चणाडाळ व चण्याचे वाटप राष्टीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लक्ष्यनिर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका १ किलो याप्रमाणे e pos व्दारे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. तसेच सदर डाळी व हरभरा रास्त भाव दुकानदारांने प्रथम येणाऱ्या शिधापत्रिकाधारकास यामध्ये ही प्राधान्याने अंत्योदय शिधापत्रिकाधारकास वितरीत करुन उर्वरीत प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकेस वितरीत करण्याचा आहे. सदरचे वाटप शिल्लक डाळी व हरभरा यांमधूनच रास्त भाव दुकानांमार्फत करण्यात येणार आहे. सदरचे वाटप माहे मे २०२१ या महिन्यात करण्यात येत आहे. माहे मे महिन्यात दिनांक १८ मे अखेर एकूण ८० हजार ८८८ कुटुंबाना मोफत डाळींचे वाटप झाले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा यादीतील कार्डधारकांना जर आपल्या कार्डवरती किती धान्य मिळते ते पहायचे असेल तरhttp://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp या संकेतस्थळावरती जाऊन आपला १२ अंकी रेशनकार्ड नंबर RC Details या ऑप्शनमध्ये नोंदवावा व रेशनकार्ड वरती किती व्यक्तींची ऑनलाईन नोंद आहे व किती धान्य मिळते याबाबत माहिती मिळवा व तसेच आपला १२ अंकी नंबर रेशनकार्डवर नोंदविला नसल्यास आपण आपले आधार कार्ड घेऊन जवळच्या रेशन दुकानात जाऊन १२ अंकी रेशन कार्ड नंबर माहिती करुन घेवू शकता, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली आहे.
माहे मे २०२१ करीता धान्य वितरण माहिती पुढीलप्रमाणे – अंत्योदय योजना नियमित – NFSA – प्रति शिधापत्रिका गहू २५ किलो, तांदूळ १० किलो, शिल्लक डाळ अथवा हरभरा उपलब्ध असल्यास १ किलोफक्त मे महिन्याकरीताच मोफत. तसेच साखर १ किलो २० रूपये प्रति किलो. प्राधान्य कुटुंब योजना नियमित – NFSA – प्रति लाभार्थी गहू ३ किलो, तांदूळ २ किलो, शिल्लक डाळ अथवा हरभरा उपलब्ध असल्यास १ किलो फक्त मे महिन्याकरीताच मोफत.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना -PMGKAY-III – अंत्योदय + प्राधान्य योजनेतील प्रति लाभार्थी गहू ३ किलो व तांदूळ २ किलो माहे मे व जून या दोन महिन्याकरीता मोफत.
सांगली जिल्ह्यात एकूण २५ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. दिनांक २६ जानेवारी २०२० ते १८ मे २०२१ अखेर एकूण १२ लाख ७२ हजार ६१८ लाभार्थ्यांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. सांगली जिल्ह्याकरीता प्रतिदिन ३ हजार शिवथाळी इष्टांक मंजूर आहे. दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून २ महिन्याच्या कालावधीकरीता मोफत शिवभोजन थाळी देण्यात येत असून या कालावधीकरीता प्रतिदिन इष्टांक दीडपट म्हणजेच ४ हजार ८०० इतका देण्यात आलेला आहे. १५ एप्रिल २०२१ ते १८ मे २०२१ अखेर एकूण १ लाख ५१ हजार २५२ लाभार्थ्यांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सांगितले.