शहरातील ७३३३ फेरीवाल्यांच्या खात्यावर १५०० रुपयांचे अनुदान जमा
कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील ७३३३ फेरीवाल्यांच्या खात्यावर राज्य शासनाकडून रुपये १५०० चे अनुदान जमा शुक्रवार दि.७ मे २०२१ रोजी जमा करण्यात आले आहे. एप्रिल २०२१ मध्ये कोवीड-१९ च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत राज्यातील फेरीवाल्यांच्या उपजिवीकेचा विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावरील फेरीवाल्यांना १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शहरातील ७३३३ फेरीवाल्यांच्या खात्यावर १५०० रुपयां प्रमाणे १ कोटी ९ लाख ९९ हजार ५०० रुपये इतके अनुदान राज्य शासनामार्फत जमा करण्यात आले आहे. यासाठी पी.एम.स्वनिधी योजनेअंतर्गतज्या फेरीवाल्यांनी दि.१५ एप्रिल २०२१ रोजी पर्यंत कर्जासाठी अर्ज केले आहेत असे सर्व फेरीवाले या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरलेले आहेत.
पी.एम.स्वनिधी अंतर्गत फेरीवाल्यांना बँकांमार्फत गेल्या वर्षी कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने आणली होती. या योजनेसाठी कोल्हापूर शहराची पथदर्शी (पायलेट सिटी) शहर म्हणून कोल्हापूर शहराची निवड करण्यात आली होती. याअंतर्गत दि.१५ एप्रिल २०२१ पर्यंत शहरातील ७३३३ फेरीवाल्यांनी कर्जासाठी या योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते. त्यापैकी ४८८० फेरीवाल्यांच्या अर्जांना बँकामार्फत मंजूरी देण्यात आली आहे. मंजूर अर्जांपैकी ४५२१ फेरीवाल्यांना कर्ज वितरीत करण्यात आले आहे. या कर्ज वितरणामध्ये कोल्हापूर महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये सुरवातीपासूनच अव्वल स्थानी आहे. प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, उपायुक्त निखिल मोरे, शिल्पा दरेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने यांचे विशेष सहकार्य लाभले. एन.यू.एल.एमचे व्यवस्थापक निवास कोळी, रोहित सोनुले, विजय तळेकर, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौंदलगेकर यांनी या योजनेचे काम पाहिले.