राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या;तातडीने लस देण्यात यावी;मंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई/ दि. १०मे/प्रतिनिधी : ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक यांना प्राधान्यांने लस दिली जात आहे. त्याच पद्धतीने राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तात्काळ लस देण्यात यावी अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि केंद्रसरकारकडून भर दिला जात आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हेदेखील बातम्यांच्या शोधात संपुर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोरोना संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.
देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे त्यामुळे आपण देखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन लस देण्यात यावी अशी विनंतीदेखील छगन भुजबळ यांनी केली आहे.