गोकुळच्या कारभारात गर्व आणि सूडभावना असणार नाही – मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही: दूध उत्पादकांच्या कल्याणच्या विश्वासानेच सत्ता दिल्याचे स्पष्टीकरण
कागल/प्रतिनिधी : सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब उत्तम दूध उत्पादकांचे कल्याण आमच्या हातून होईल, या भावनेने सभासदांनी ही सत्ता आमच्या हाती दिली आहे. दूध संघाच्या कारभारात गर्व आणि सूडभावना असणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जनता, ठरावधारक सभासद आणि कार्यकर्त्यांनी आमच्यावर प्रचंड विश्वास दाखविला. हा विश्वास सार्थ करून दाखवू, अशी ग्वाहीही ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, रविवारी गोकुळ दूध संघाचे मतदान झाल्यानंतर मी मुंबईला गेलो आणि गेले चार दिवस मुंबईतच होतो. मी प्रचार सभांमधूनच सांगितलं होतं की, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित असून फक्त अध्यक्ष निवडीची औपचारिकताच बाकी आहे. निकालही तसाच झाला.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ही निवडणूक लढताना आपले संपूर्ण कुटुंब आणि उमेदवार असलेला आपला मुलगा नवीद आव्हाने पेलत आणि झेलत लढला. नविदच्या पत्नीसह त्याची दोन्ही मुलेही कोरोना पॉझिटिव्ह होती. तसेच माझी दुसरी सूनही पॉझिटिव्ह होती. त्यांच्यावर कोल्हापुरात खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. अशा परिस्थितीत आमचे अख्खे कुटुंबच उरावर दगड ठेवून प्रचारात सक्रिय होतं. आम्ही आमचे दुःख आणि वेदना जनतेला जाणवूसुद्धा दिल्या नाहीत.
सत्ताधाऱ्यांकडून गोकुळ मल्टीस्टेट करण्याच्या हालचालींपासून मी व पालकमंत्री सतेज पाटील यांनी हा संघर्ष सुरू केला होता. त्याविरोधात अनेक वर्षे लढा दिला आणि सकारात्मक अजेंडा घेऊन या निवडणुकीत आम्ही उतरलो. एवढ्या प्रचंड विजयानंतर लिटरला दोन रुपये दूध दरवाढ, पारदर्शक व स्वच्छ कारभार आणि काटकसरीतुन संघाचा लौकिक वाढवणे त्याबरोबर शेणा-मुतात राबणाऱ्या माता-भगिनींना दीपावलीला सोन्याने मढवीने, पशुखाद्यासह पशुवैद्यकीय व इतर सेवा दर्जेदाररित्या पुरविणे, गोकुळ दूध संघाची प्रतिदिन संकलन क्षमता २० लाख लिटर करणे हा आमचा निर्धार असेल, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता, उत्पादक सभासद आणि शेतकरी व परमेश्वराने आम्हाला यशोशिखरावर नेऊन ठेवले आहे. आम्हाला “ग” म्हणजे गर्वाची बाधा होऊ नये. दूध उत्पादकांच्या विश्वासास सार्थ राहून चांगला कारभार करताना सूडभावना मनात येऊ नये, अशी आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना करीत असल्याचे ते म्हणाले.मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळ दूध संघात ३० वर्षाने सत्तांतर झाले आहे. सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते आणि दूध संघाचे ठरावधारक तसेच नियती आणि परमेश्वरच आमच्या बाजूने असल्याने हे सत्तांतर झाल आहे. मी आणि पालकमंत्री सतेज पाटील याच काळात मंत्रीपदी असणं, सत्तारूढ गटातून विश्वास नारायण पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर यांच्या धर्मपत्नी श्रीमती जयश्री पाटील, आमदार राजेश पाटील हे बाहेर पडणं तसेच निवडणूक पुढे ढकलण्याची सत्तारूढाची मागणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळनं हा सगळा योगायोग याच काळात घडायचा होता.
चौकट –
काही जणांकडून मंडलिक -मुश्रीफ गटात भांडण लावण्याचा उद्योग –
विरेंद्र मंडलिक यांची ‘आम्हाला ठरवून पाडले आहे’ या आशयाची फेसबुक पोस्ट फिरत असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, आमच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या चार उमेदवारांचा पराभव झालेला आहे. त्याची सखोल चौकशी करून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ करावं. त्याबाबत योग्य तो निर्णय नेत्यांनी घ्यावा. विरोधकांकडून मुश्रीफ व मंडलिक गटात भांडणे लावण्याचा उद्योग काहीजण जाणीवपूर्वक करत असल्याकडेही श्री. माने यांनी लक्ष वेधले. परंतु; अशा गोष्टींवरून आमच्यात भांडण होणार नाही अशी पुष्टी मंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.