लसीकरण केंद्रावरील आरेरावी रोखण्यासाठी केंद्रावर पोलीस कर्मचारी नियुक्ती करा :
भाजपाचे निवेदन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रावर काल एका माजी नगरसेवकांने व त्याच्यासोबत काही लोकांनी केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली. याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थआणि संबंधीतांवर कडक कारवाई व्हावी यासाठी भाजपा शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना निवेदन सदर केले.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, सध्या कोल्हापूर शहरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरु आहे. लसीकरण केंद्रावरील अनिश्चितता, अस्पष्टता यामुळे सर्वसामान्य लस घेणारा नागरिक संभ्रमावस्थेत आहे. लस घेण्यासाठी नागरिक सकाळी ६ वाजले पासून केंद्रावर थांबून असतात. त्यातच वशिलेबाजी आणि दबावतंत्र यामुळे नियमाने लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यास येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत त्यातूनच अशा केंद्रावर हातघाईचे प्रसंग उद्बभवत आहेत. काल सर्व लसिकरण केंद्रावर केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस मिळणार होती,परंतु संबंधित माजी नगरसेवक हे नोंदणी केलेल्या नागरिकांना थांबवून आपल्या जवळच्या नागरिकांना लस देण्याचा आग्रह करत होते व त्यातूनच त्यांनी व इतर नागरिकांनी कर्मचाऱ्यास मारहाण केली. लसीकरण केंद्रावर अशा पद्धतीच्या घटना होणे ही गंभीर गोष्ट असून भारतीय जनता पार्टी या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. वास्तविक पाहता ज्यांनी समाजापुढे शिस्तीचा आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे अशा वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्तीने असा प्रकार करणे निंदनीय आहे. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचा पूर्ण पारदर्शकतेने तपास होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी भारतीय जनता पार्टीच्यावतीने मागणी करण्यात आली.
त्याचबरोबर लसीकरण सुरू झाल्यापासून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर काही माजी लोकप्रतिनिधी तसेच अन्य काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते ऑनलाइन नोंदणी करून लसीकरणासाठी आलेल्या आणि पाळीत उभारलेल्या नागरिकांना मागे ठेवून आपल्या मर्जीतील नागरिकांना लस देण्यासाठी लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहेत असे चित्र दिसत आहे. तसेच लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी ही केंद्रावरील मनपा कर्मचाऱ्यांना आवरता येत नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टंसिंग चा पूर्ण फज्जा उडत आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर किमान एक महिला कर्मचारी व एक पुरुष कर्मचारी यांची बंदोबस्तासाठी योजना करावी अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली.
शिष्टमंडळाच्या निवेदनाला उत्तर देताना अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे म्हणाले, लसीकरण कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन होणारी गर्दी व गर्दीतून निर्माण होणारे वाद-विवाद टाळण्यासाठी लसीकरण केंद्रावर तातडीने पोलीस कर्मचारी नियुक्त केला जाईल तसेच केंद्रावर कार्यरत असणाऱ्या कर्मचा-यांवर कोण दबाव आणल असेल, दहशत माजवत असेल अशा लोकांना पोलिसी हिसका दाखवण्यात येईल प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगितले. याप्रसंगी सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, माजी नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते.