गोकुळ निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात; २ मे रोजी मतदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणूकीसाठी रविवारी २ मे रोजी मतदान होणार आहे. २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात असून ३,६५० मतदार आहेत. येथे सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक,माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी व पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये ही निवडणूक होत आहे.राज्यातील सर्वात सक्षम व आर्थिक उलाढाल मोठी असलेल्या गोकुच्या निवडणुकीची गेली दोन महिने रणधुमाळी सुरू आहे. संघावर गेली अनेक वर्षे पी. एन. पाटील व महादेवराव महाडीक यांची सत्ता आहे. मागील निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. गेली पाच वर्षे दूध दरवाढ, पशुखाद्याच्या दरातील वाढ, मल्टीस्टेटच्या मुद्यावरून मंत्री पाटील यांनी सत्तारूढ गटाची कोंडी केली होती. त्यांच्या रेट्यामुळेच मल्टीस्टेटचा निर्णय मागे घ्यावा लागला होता.हाच मुद्दा सध्या प्रचारात असून टँकर वाहतुकीसह आदी मुद्यांवर विरोधकांनी रान उठवले आहे. तर चारशे कोटींच्या ठेवी असणारा गोकुळ हा राज्यातील एकमेव दूध संघ असल्याचा दावा सत्तारूढ गट करत आहे. त्याचबरोबर ३,१३,२३ तारखेला न चुकता दूध उत्पादकांना पैसे देण्याची परंपरा जोपासल्याचा मुद्दा त्यांनी प्रचारात रेटला आहे.शिष्टाचार विरुद्ध भ्रष्टाचार अशी ही निवडणूक आहे असे सत्तारूढ यांची भूमिका आहे. तर गोकुळच्या कारभारावर टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी त्यापेक्षाही मंत्री सतेज पाटील व महादेवराव महाडीक यांच्यातील जुगलबंदीने या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे.तालुक्याच्या ठिकाणी ७० केंद्रांवर मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेऊन ही प्रक्रिया पार पाडली जाणार असून मंगळवारी (दि. ४) मतमोजणी होणार आहे. संघाचे ३,६५० मतदार असले तरी आतापर्यंत तीन सभासदांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रत्यक्षात ३,६४७ सभासदच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, सहाय्यक म्हणून तहसीलदार शरद पाटील व सहाय्यक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख हे काम पाहत आहेत.एकूणच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कोण मात देणार आणि कोण मात खाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.