रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून छडा
कोल्हापूर/प्रतिनिधी : रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावून दोघांना ताब्यात घेतले आहे. योगीराज राजकुमार वाघमारे राहणार शाहूपुरी, आणि पराग विजय कुमार पाटील राहणार कसबा बावडा अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रेमडेसिवीर या जीवनावश्यक इंजेक्शनच्या अकरा बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या टंचाईचा गैरफायदा घेऊन संशयितांनी प्रत्येकी अठरा हजार रुपये या दराने इंजेक्शनचा काळाबाजार आणि विक्री सुरू केली होती. पोलिस अधीक्षक शैलेश बळकवडे यांना संशयितांच्या कार्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि पथकाने छापा टाकून मुख्य संशयित योगीराज वाघमारे आणि त्याचा साथीदार पराग पाटील याला सापळा रचून जेरबंद केले. टोळीतील आणखी तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.