कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आमदार निधीतून ५० लक्ष रुपये
मुंबई/प्रतिनिधी : सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढतो आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी अस्तित्वात असलेली साधनसामग्री देखील अपुरी पडत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्याकरिता आवश्यक असलेली साधनसामग्री खरेदी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी आपल्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करण्याच्या सूचना भंडारा जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. या निधीतून जिल्हा प्रशासनाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर, हॉस्पिटल बेड, आय सी यू बेड, एन आय सी यु व्हेंटिलेटर्स, इमर्जन्सी ट्रॉली, फार्मास्युटिकल फ्रिज, व्हॅक्सिन बॉक्ससह इतर आवश्यक उपकरणे व औषधे यांची खरेदी करता येणार आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे भंडारा जिल्ह्याला कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये बळ मिळणार आहे.
कोरोनाविरोधातील या लढाईत नागरिकांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. ब्रेक द चेन अंतर्गत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.