युवक काँग्रेसची राज्यव्यापी रक्तदान शिबीरे; २५ हजार रक्तपिशव्यांचा निर्धार – सत्यजित तांबे
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत असताना रक्ताचा तुडवडाही मोठ्या प्रमाणात भासत आहे. राज्यासमोरचे रक्ताचे संकट लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करुन २५ हजार पिशव्या रक्तसंकलन करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना तांबे म्हणाले की, कोणतीही नैसर्गिक आपत्ती वा संकटकाळात युवक काँग्रेस नेहमीच जनतेच्या सेवेसाठी उभी राहिली आहे. राज्याला सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असल्याने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तसंकलन केले जाणार आहे. मागील वर्षीदेखील राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवला असताना महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पुढाकाराने राज्यभरात रक्तदान शिबिरे घेऊन २८५०० रक्तपिशव्यांचे संकलन केले होते.
या वर्षी देखील मागील वर्षीप्रमाणे रक्तदान शिबिरे घेतली जाणार असून किमान २५ हजार रक्तपिशव्यांचे लक्ष्य ठेवलेले आहे. सरकारने घालून दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुनच ही रक्तदान शिबीरे घेतली जातील, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनच्या काळात युवक काँग्रेसने चालवलेल्या मदतकार्यात पन्नास लाखांपेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष अन्नधान्य व जेवणाचे वाटप, लाखो लोकांना मास्क आणि आर्सेनिक एल्बम ३० या औषधांचे वाटप, कोरोना योध्यांचा सत्कार असे अनेक उपक्रम राबवले होते. यावर्षीदेखील युवक काँग्रेस गरज पडेल तशी सर्व प्रकारची मदत महाराष्ट्रभर करेल, असा विश्वास सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.