खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने शिवाजी विद्यापीठात पार पडली विशेष बैठक
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांस अनुसरून अनेक प्रकाशनांकडून पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात. या पाठ्यपुस्तकांमध्ये काही वेळेस आक्षेपार्ह मजकूर छापल्याने वादाचे प्रसंग ओढवले आहेत. विद्यार्थ्यांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जाऊ नये तसेच यामुळे सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने शिवाजी विद्यापीठात विशेष बैठक आयोजित करण्यित आली होती. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा संबंधित कोणत्याही प्रकाशका कडून पुस्तक प्रकाशित होत असताना, त्या पुस्तकातील मचकूर विद्यापीठाकडून तपासून घेण्यात यावा, अशी आग्रही सुचना खा.संभाजीराजेंनी मांडली.
बी.ए. व एम.ए. इतिहास या विषयाच्या अभ्यासक्रमात महाराणी ताराबाई राणीसाहेब, कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाई साहेब, क्रांतीवीर छत्रपती चिमासाहेब महाराज तसेच करवीर राज्याचा इतिहास समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी जेष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी केली.
वेगवेगळ्या प्रकाशनांकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांना अधिकृतपणे प्रमाणित करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने तज्ञ समिती नियुक्त करण्यात येईल व या समितीकडून प्रमाणित झाल्यानंतरच प्रकाशकांना पाठ्यपुस्तक वितरीत करता येईल. याचबरोबर, विद्यापीठाचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्याबाबत कुलगुरू डाँ.डि.टी.शिर्के यांनी संबधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.या बैठकीस कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, जेष्ठ इतिहास संंशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास विभागप्रमुख अवनिश पाटील यांचेसह इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, राम यादव व राहूल शिंदे उपस्थित होते.