यावर्षी एप्रिल-मे महिन्यात उष्णता वाढणार, उन्हाळा धोकादायक,हवामान तज्ज्ञांचा इशारा
कोल्हापूर/प्रतिनिधी : मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात उष्णतेच्या लाटेमध्ये वाढ होईल,
असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने अधिक धोकादायक असून मध्य भारत, उत्तर, पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील,
असेही खात्याने स्पष्ट केले आहे. मार्च ते मे महिन्यात ओडिशा, झारखंड येथे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसने अधिक किंवा अत्याधिक असेल. हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या मते, मार्च ते मे २०२१ मध्ये दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, हरियाणा येथे दिवसाचे आणि रात्रीचे तापमान व उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढणार आहे. तसेच हिमाचल प्रदेश, कच्छ, राजस्थान, उत्तराखंड, मेघालय, अरुणाचल, सिक्कीम, मिझोरम, मणिपूर, बिहार या प्रदेशांतही तापमान वाढणार आहे.
दक्षिण भारतात तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही भागांत तापमान ०.५ अंश सेल्सिअसने अधिक राहील. दक्षिण आशियात तापमान अधिक वाढेल आणि २०२१च्या अखेरीस स्थिती आणखी गंभीर होईल, असे भारतातीलच नाही तर जागतिक हवामान खात्यानेही म्हटले आहे.
उष्णतेच्या लाटांची सुरुवात २०१५ पासून झाली आणि भारत व पाकिस्तानात आतापर्यंत पाचवी सर्वाधिक उष्णतेची लाट आली होती.
उष्णतेच्या लाटेमुळे सुमारे तीन हजार ५०० लोक मृत्युमुखी पडले होते. २०२१च्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसार जगातील अति धोकाग्रस्त देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर आहे. २००० ते २०२० या २० वर्षांच्या कालावधीत जगभरात सुमारे चार लाख ५७ हजार लोक हवामान बदलाला बळी पडले आहेत. २०२१ अति तापमानाचे.२०१५ ते २०२० ही वर्षे अत्याधिक उष्णतेच्या लाटांची वर्षे ठरली आहेत.