रश्मी शुक्लांकडून अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी कोट्यावधीच्या ऑफर- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा पत्रकार परिषदेत आरोप
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार यावे यासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला अपक्ष आमदारांना कोट्यावधीच्या ऑफर देत होत्या, असा घणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या काळातील २४ ऑक्टोबर २०१९ ते २४ नोव्हेंबर २०१९ या महिनाभरातील रश्मी शुक्ला यांच्या फोनच्या सीडीआरची चौकशी करा, अशी जोरदार मागणीही कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, श्रीमती शुक्ला यांच्यावरील या आरोपांबाबत आमदार म्हणून अपक्ष निवडून आलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही दुजोरा दिला आहे. वास्तविक; अशा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी अशा कामांमध्ये असणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. कालच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केलेल्या प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या या फोन टॅपिंग बरोबरच त्यांनी बदल्यांबाबतही माहिती दिली होती. दरम्यान, बहुतांशी बदल्या या अस्थापना मंडळाच्या संमतीने झाल्या होत्या. काही थोड्याच बदल्या बाहेरच्या होत्या.
कालच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की श्रीमती रश्मी शुक्ला यांनी समाजविघातक शक्ती असणाऱ्यांचे फोन टॅप करावे लागतील, असे म्हणून परवानगी घेतली आहे. परंतु; त्यांनी तर मंत्र्यांचेच फोन रेकॉर्ड केले, ही बाब अत्यंत गंभीर गुन्हा आहे. मंत्री मुश्रीफ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न विसरून जावं. कारण, महाविकास आघाडी भक्कम आहे. कालच मी टीव्हीवर बघत होतो, श्री.फडणवीस क्रिकेट खेळत होते व ते सांगत होते की, लूज बॉल आला की सीमेपार घालवतो. त्यांना एकही बॉल सीमेपार घालवता आला नाही. एक बॉल उडवून मारला, तोही झेलबाद झाला असता. त्यांना बॅटिंगही व्यवस्थित करता येत नाही, असे सूचक वक्तव्यही श्री. मुश्रीफ यांनी केले.
अंबानींच्या घरासमोरील स्फोटक ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरण यांची हत्या प्रकरण हा तपास एटीएसने केला असता तर तो दोनच दिवसात पूर्ण झाला असता. वास्तविक, या तपासाची दिशा भरकटण्यासाठीच विरोधक अशी प्रकरणे उकरून काढत आहेत, असे मला वाटते.
श्री मुश्रीफ म्हणाले, याआधीच्या भाजप सरकारच्या काळात बऱ्याच अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळाले असल्यामुळे ते खाल्ल्या मिठाला जागत आहेत. वास्तविक; त्यांनी कुणा व्यक्तीच्या नव्हे तर सरकारच्या खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे. मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांबाबतीत योग्य ती खबरदारी घेऊन कारवाई करतीलच.”सत्तेसाठीचा हा थयथयाट आता थांबवा” रश्मी शुक्ला यांच्या बेकायदेशीर फोन टॅपिंगवरून आणि त्यांनी दिलेल्या बदल्यांच्या माहितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणा भीमदेवी थाटात केलेले आरोप तकलादू आणि लवंगी फटाक्यासारखे होते, हे आता संपूर्ण महाराष्ट्रासमोर आले आहे. हा अहवाल घेऊन ते लगेच दिल्लीला गेले, केंद्रीय गृह सचिवांना दिला व बाहेर येऊन माध्यमांना माहिती दिली. राज्यातील भाजपची सत्ता गेल्यामुळे सुरू असलेला हा थयथयाट आता त्यांनी थांबवावा.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल विरोधी पक्षनेते आणि देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी,खाल्ल्या मिठाला जागणाऱ्या अधिकाऱ्यांकडून चुकीचे अहवाल घेऊन आरोप करून देवेंद्र फडणवीस हसं करून घेत आहेत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव सरळ, सोज्वळ असल्यामुळे त्यांनी महिला म्हणून रश्मी शुक्लाना माफ केल असाव. परंतु; असे अधिकारी किती मारक ठरू शकतात, याचेच हे उदाहरण आहे,फोन टॅपिंग केलेला अहवाल आठ महिन्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांकडे जातोच कसा? हे तर मुद्दाम केलेलं षडयंत्र आहे,महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांनी केंद्र सरकारच्या सगळ्या यंत्रणा कामाला लावल्यात. परंतु; काहीही उपयोग होणार नाही.मी यापूर्वीही सांगितले आहे, की राजभवन हे भाजपचे कार्यालयाचे झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनातच एखादी खोली घेऊन राहावं, म्हणजे यायला- जायला वेळ लागणार नाही.कुठलीही घटना घडली कि त्यामध्ये राजकारण आणून सरकारला अस्थिर व बदनाम करण्याचे कारस्थान विरोधक सातत्याने करीत आहेत. त्यांना स्वस्थ बसवतच नाही,महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येणे शक्यच नाही. कारण, बहुमत घट्ट आहे. बहुमत घट्ट असल्याची विरोधकांनाही खात्री झाली आहे, त्यामुळे या अशा काहीतरी चुकीच्या कारवाया करून विरोधक वारंवार उघडे पडत आहेत,कोरोना परिस्थितीमुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली नाही. ती कधीही होऊ देत. १९० हून अधिक आमदारांचा आमचा एकगठ्ठा आहे. रश्मी शुक्ला यांच्या फोनच्या सीडीआर चौकशी मधून भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्यासाठी विरोधकांनी किती कारस्थाने केली आहेत, ते उघडकीस येईल.