मोस्ट वाँटेड गुन्हेगार आप्पा मानेच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्या
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोडोली पोलिस ठाण्यात मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पसार झालेला कुख्यात गुन्हेगार आप्पा उर्फ सुभाष माने (वय ३२, तामशेतवाडी, सोलापूर) व त्याच्या साथीदार सुहास सोनवलकर (वय २४, वडले, फलटण) या आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ पिस्तुल, वीस जिवंत राऊंड आणि तीन मॅक्झिन असा शस्त्रसाठाही जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जलद कृती दलाच्या पथकाने ही कारवाई केली.
आप्पा माने याच्यावर दरोडा, जबरी चोरी, खंडणी यासारखे १९ गुन्हे दाखल आहेत. मोकाचे तीन गुन्हे दाखल असून, तो पसार होता. २०१९ मध्ये ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी भाविकांना लुटण्याच्या तीन घटना घडल्या होत्या. यामध्ये आप्पा माने व त्याच्या तीन साथीदारांचा सहभाग होता, २०२० मध्ये राजगड येथे पोलिसाचा वेश करून आप्पा व त्याचा साथीदार सुहास सोनवलकर या दोघांनी कामगारावर फायरिंग करून १७ तोळे दागिने लुटले होते.
मागील सहा महिन्यांपासून आप्पा व सुहास सोनवलकर या दोघांचा गडहिंग्लज, बेळगाव या परिसरात वावर होता. दोघे कोल्हापुरात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यांनी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, राखीव पोलिस पथकाचे सत्यवान माशाळकर, सहाय्यक निरीक्षक सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक शाहू टोल नाका परिसरात पाठवले. दोन्ही गुन्हेगार शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाल्याने जलद कृती दलाचे एक पथक ही या पोलिसांसोबत होते. संशयित आरोपी दुचाकीवर आल्याचे समजताच त्यांना अडवून पोलिसांनी दोघांवर झडप टाकत अटक केली.