‘नमामि पंचगगा’ असा प्रकल्प राबवावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : पंचगंगा नदी प्रदूषणामध्ये विविध कारणांमुळे लक्षणीय वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ही एक प्रमुख नदी असून हजारो एकर क्षेत्र या नदीमुळे ओलिताखाली आले आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे.पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय स्तरावर प्रयत्नशील आहे. ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि पंचगगा’ असा प्रकल्प राबवावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी २०१७ साली राज्यसभेत केली होती. तेव्हापासून यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयासोबत संभाजीराजे यांचा पत्रव्यवहार सुरू आहे. खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नांमुळे पंतप्रधान कार्यालयास पंचगंगा नदी व नदीप्रदूषण याविषयीचा संपूर्ण डाटा प्राप्त झाला आहे. आज या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांचेसमवेत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.यावेळी झालेल्या बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री श्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा सविस्तर आराखडा सादर करण्याची जबाबदारी घेतली. याविषयी बोलताना, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न हा सर्वांच्या आरोग्याशी तसेच शेतजमिनींच्या गुणवत्तेशीदेखील निगडीत असल्याने पंचगंगेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संभाजीराजे यांनी केले.