गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र भरून देणे बंधनकारक – दत्तात्रय कवितके
कोल्हापूर/प्रतिनिधी : अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेमधील अर्जामध्ये जे शिधापत्रिका जोडणी नाही, असे नमूद करतील अशांनीच गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र भरून द्यायचे आहे. तसे अर्जाच्या पहिल्या पानावरच स्पष्टपणे नमूद आहे. याबाबत कुणीही कसलेही गैरसमज पसरवू नयेत. दुकानदारांना स्पष्टपणे याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
जे शिधापत्रिकाधारक आपल्याकडे गॅस आहे अशी माहिती अर्जामध्ये नमूद करणार आहेत, त्यांनी अर्जामधील हमीपत्र भरून देण्याचा प्रश्नच येत नाही. गॅसबाबत ज्यांनी आपल्याकडे गॅस नाही, अशी खोटी माहिती दिल्याचे पुढे निष्पन्न झाल्यास त्याची शिधापत्रिका रद्द करण्यास पात्र राहील, असा हमीपत्राचा अर्थ आहे. म्हणजे ज्यांच्याकडे गॅस आहे आणि गॅस असल्याची त्यांनी अर्जामध्ये माहितीही भरली आहे, त्यांची शिधापत्रिका रद्द होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. अर्ज व्यवस्थित न वाचल्यामुळे याबाबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. गॅसची माहिती ही त्या शिधापत्रिकाधारकाला केरोसीन मिळण्याशी संबंधित आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांमध्ये अजूनही केरोसीन वितरण चालू आहे तिथेच हे हमीपत्र महत्वाचे आहे.