पालकमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करत कोट्यावधी रुपयांचा घरफाळा बुडवला – माजी खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेने नुकतीच अनावश्यक व गरज नसताना केवळ महानगरपालिकेची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेवर घरफाळा व पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित करून अनाठाई करवाढ करून जनतेवर जिझिया कर लादला आहे. महापालिकेने आर्थिक तूट भरून काढण्याकरता घरफाळा वाढ व पाणीपट्टी वाढ करण्याशिवाय अन्य गत्यंतर नाही असा बनाव केल्याचे दिसून येत आहे. मुळात कोल्हापूर महानगरपालिकेने शहर हद्दीतील सर्व मिळकतींची खानेसुमारी करण्याकरता एक स्वतंत्र एजन्सी कोट्यावधी रुपयांचे शुल्क भरून नेमली होती. सदरच्या कंपनीने कोणताही अहवाल योग्य व वस्तुनिष्ठ दिलेला नाही. उलटपक्षी मिळकतधारकांशी संगणमत करून त्यांच्या अर्थानंरूप मिळकतींची खोटी मापे देऊन मिळकतींचे घरफाळा आकारणी केली. याबाबत भाजप ताराराणी आघाडी पक्षामार्फत सभागृहात ध्वनीफिती व चित्रफिती दाखवल्या गेल्या होत्या. तरी मुळात सर्व मिळकतींचे योग्य खानेसुमारी केलेस व प्रामाणिकपणे कर निर्धारण केले घरफाळा वाढ करण्याची गरजच भासणार नाही. पाणी पट्टी बाबतीतही तीच परिस्थिती आहे. अनेक मिळकतींचे पाणी मीटर बंद असून ती सरासरीने आकारली जात आहे. अनेक मिळकतींना पाणी मीटर नसून चोरट्या पद्धतीने पाणी उपसा सुरू आहे. या सर्व बाबींचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक पुरवठा होणार असल्याने घरफाळा वाढ व पाणीपट्टी वाढ करण्याची गरज भासणार नाही. त्याच प्रमाणे महापालिकेतील अनेक धनदांडगे व राजकीय पुढारी यांच्या मिळकतींना घरफाळा आकारणीत केलेली नाही महापालिका हद्दीतील अंदाजे वीस हजार मिळकतींना घरफाळा आकारणी न करता झिरो बिलिंग करण्यात आलेले आहे. या घरांची घरफाळा आकारणी केल्यास कोट्यावधी रुपयाचा घरफाळा वसूल करता येणार आहे. यापैकी एक उदाहरण द्यायचे झाल्यास कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार असलेल्या सयाजी हॉटेलला घरफाळा आकारणी पूर्णतः चुकीची व बेकायदेशीर करण्यात आलेली आहेत. सदर च्या हॉटेल मध्ये असलेले पीव्हीआर, शॉपर्स स्टॉप,कॉन्फरन्स व पार्टी हॉल,रेस्टॉरंट बार व अन्य तीस मिळकती भाड्याने दिलेल्या असून घरफाळा आकारणी खुद्द मालक वहिवाटनुसार केलेली आहे. या मिळकतींची मापे देखील चुकीची दाखवलेली आहेत. आणि या चुकीच्या मापे दाखवल्यामुळे करोडो रुपयांचा घरफाळा बुडवला गेलेला आहे. तसेच ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क या मिळकतीचा सन १९९७ पासून घरफाळा थकीत असून दंड व व्याजासह ही रक्कम जवळपास९२ हजार इतकी होते. ती देखील बुडवण्यात आली आहे. अशा या भुरट्या खर्च कर चोऱ्यांमुळे महापालिकेची आर्थिक लूट होत आहे. या लुटीचे परिणाम आर्थिक तूट होण्यामध्ये दिसत आहेत. ही तूट भरून काढण्याकरिता सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. ही लूट निषेधार्थ असून या लुटीविरुद्ध कारवाई करावी असे माजी खासदार धनंजय उर्फ महाडिक यांनी सांगितले.जर का लवकरात लवकर महापालिकेने यांच्यावर कारवाई केली नाही आणि सत्तेचा गैरवापर थांबला नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि महापालिकेच्या दारात उपोषण करू,असा इशारा धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी माजी महापौर सुनील कदम, नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम उपस्थित होते.