मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा आढावा लस घेण्याचे केले आवाहन
कागल/प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल मध्ये झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ४५ ते ६० वयोगटातील इतर व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण आणि ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक यांनी लस घेण्याचे आवाहनही केले. येथील डी आर माने महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कोरोना लसीकरण व कोरोना आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कागलचे उप अभियंता व्ही. डी. शिंदे, जिल्हा परिषदेचे बांधकाम उपअभियंता श्री. चांदणे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, कागलचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर आदी उपस्थित होते. यावेळी लसीकरण मोहिमेबाबत प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली.
चौकट……..
शंकराप्रमाणेच मीही भोळाभाबडा…….
या बैठकीतच मंत्री श्री. मुश्रीफ यांना पत्रकारांनी तुम्ही कधी लस घेणार आहात, असे विचारले असता ते म्हणाले, अधिवेशन संपल्यानंतर मुंबईवरून येऊन येत्या बुधवारी म्हणजेच ११ मार्चला मी लस घेणार आहे. त्यादिवशी महाशिवरात्रि असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर श्री. मुश्रीफ म्हणाले, शंकर महादेवाप्रमाणेच मी ही भोळाभाबडा आहे. जगाच्या कल्याणासाठी शंकराने विष प्राशन केले होते आणि ते पचवण्यासाठी कंठात रामनामाचा अखंड जप केला होता. माझाही जन्म रामनवमीचा आहे.भगवान शंकर हे पहिले वारकरी आणि पहिले शेतकरी होते, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.