समाजमन संस्थेचा पहिला वर्धापनदिन साजरा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : आजकालच्या काळात समाजातील संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. माणसातील माणूसपण हरवत चाललले आहे. त्यामुळे माणसा, माणसांत मोठी दरी निर्माण होवू लागली आहे. खर तर एका माणसाने दुसऱ्या दु:खी आणि संकटात सापडलेल्या माणसांच्या हाकेला धावून जायला हवे, प्रसंगी त्याचे अश्रू पुसण्याचे, त्याला आधार काम हातून घडायला हवे आणि अशाचप्रकारचे बांधिलकीबरोबरच माणसातील माणुसकी जोपासणारे काम कोल्हापुरातील समाजमन सामाजिक संस्था करत आहे, असे सांगत संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे यांनी समाजमन संस्थेच्या माध्यमातून सुरु ठेवलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद ठरले आहे, असे गौरवोद्गार गोपाळकृष्ण गोखले कॉलेजचे प्राचार्य पी. के. पाटील यांनी काढले. कोल्हापुरातील समाजमन संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी होते.
गोखले कॉलेजमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिका सौ. संजीवनी तोफखाने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजमन संस्थेला वर्षभरात ज्यांनी, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत किंवा संस्थेच्या उपक्रमांना सहकार्य केले, अशा घटकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्रा. सी. एम. गायकवाड, प्रा. दीपककुमार वळवी, प्रा. एम. टी. पाटील, प्रा. दिपक भोसले, पदमाकर कापसे, शरयू भोसले, पत्रकार राजेंद्र मकोटे, पत्रकार नरके, सौ. मनिषा शेणई आदी मान्यवरांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोखले कॉलेजचे प्राचार्य पी. के. पाटील यांनी समाजमन संस्थेच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले, समाजमन संस्थेने वर्षभरात विविध उपक्रम राबवून एक चांगले कार्य केले आहे. समाजातील दु:खी व गरजू लोकांच्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून धावून जाण्याचे केलेले कार्य कौतुकाला पात्र ठरले आहे. भविष्यातही समाजमन संस्थेला आपण सर्वतोपरीने सहकार्य करण्यासाठी बांधील राहू, अशी ग्वाही प्राचार्य पाटील यांनी दिली. श्री. माळी पुढे म्हणाले, समाजकार्य करण्याची वृत्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. हे काम करणेही आज सोप राहिलेले नाही. महेश गावडे यांचे काम म्हणजे एकखांबी तंबुप्रमाणेच आहे. त्याची समाजातील विविध प्रश्न व समस्या सोडवण्याप्रती चाललेली धडपड चांगली आहे. त्याच्या पुढील कार्याला माझ्या शुभेच्छा. महेश गावडे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेने गतवर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेत, संस्थेला विविध प्रकारे सहाय्यभूत ठरलेल्या घटक, व्यक्ती, संस्थां यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच गोखले कॉलेजचे प्राचार्य पाटील व पत्रकार गुरुबाळ माळी यांचेही आभार मानले.
यानंतर प्रा. दिपककुमार वळवी, प्रा. एम. टी. पाटील यांनीही महेश गावडे यांना कॉलेजजीवनापासून ओळखत असून समाजमन संस्थेच्या माध्यमातून तो करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे नमुद केले. सी.एम. गायकवाड, प्रा. दीपक भोसले, राजेंद्र मकोटे यांनीही श्री. गावडे यांना शाबासकीची थाप देवून समाजमनच्या कार्याला पाठिंबा व्यक्त केला.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या उपाध्यक्षा प्रसन्नता चव्हाण, सदस्य प्रियदर्शनी चोरगे आणि खजानीस सतीश वडणगेकर यांनी केले. आभार प्रा. वळवी यांनी मानले.
..
चौकट
एकप्रकारची बंडखोरी
सौ. संजीवनी तोफखाने म्हणाल्या, समाजात वेगवेगळ्या स्वरुपाचे प्रश्न असतात, हे कधी, कधी आपल्यालाही समजत नाही. समाजमन संस्थेने मागीलवर्षांत असे प्रश्न हाताळले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश गावडे यांचे कार्य म्हणजे एकप्रकारची बंडखोरी आहे. समाज सुधारणा करण्याची त्यात ताकद आहे. श्री. गावडे यांच्यासारख्या १०० मुलांची टोळी निर्माण झाली तर समाजातील चित्र नक्कीच बदलेल. या संस्थेला भविष्यातही माझा पाठिंबा व पाठबळ राहिल.
…..
चौकट
आपल फाटलेलं असताना…
ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ अध्यक्षीय भाषणात म्हणाले, धन नसले तरी चालेल, पण मन मात्र मोठं हवे. ते मन मोठं असेल तर आपण काहीही करु शकतो. समाजात बरेच प्रश्न असतात. समाजमनचे अध्यक्ष महेश गावडे यांनी जीवनात आलेल्या विविध अडचणींवर मात करुन मार्गक्रमण सुरु ठेवले आहे. गेली दहा वर्षे तरी त्याचा जीवनसंघर्ष मी जवळून पाहिला आहे. आपल फाटलेलं असताना जो दुसऱ्यांच शिवायला धडपडतो, तेच खर समाजमन आहे.