जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत
१० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शनिवार १० एप्रिल २०२१ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी दिली.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोड-योग्य दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, भूसंपादन, वैवाहिक वादाची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम (एन.आय.ॲक्ट) १३८ खालील प्रकरणे, बॅक वसुली, अपघात न्यायाधिकारणाची, कामागार न्यायालयाची प्रकरणे, तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणात देखील कोणत्याही प्रकारचा खर्च न करता आपसी समझोत्याने वाद संपुष्टात आणण्याची संधी आहे. पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणात वीज बिलाची वादपूर्व प्रकरणे, बी. एस. एन. एल., वीज वितरण संबंधाने येणारी सर्व प्रकारची प्रकरणे तसेच बॅकेच्या थकीत कर्जाची प्रकरणे आपसी तडजोडीने लोक अदालतीमध्ये संपूष्टात आणली जाणार आहेत.
लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणात आपआपल्या वरिष्ठ न्यायालयात अपील करता येत नाही. तसेच यात पुरावा, उलट तपास तसेच युक्तीवाद या बाबींची काही गरज नसते. तज्ज्ञ न्यायाधीश व वकील मंडळीच्या एक पॅनलद्वारे अगदी कमी वेळेत, कोणताही खर्च न करता लवकरात लवकर निकाल लावला जाते. तसेच निकाली निघालेल्या प्रकरणात कायद्यानुसार कोर्ट फी परत मिळण्याची सुध्दा तरतूद आहे. तरी आपले प्रकरण लोकन्यायालयात ठेवण्यासाठी जवळच्या न्यायालयाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा यांच्याशी संपर्क साधावा. तसेच वकील, पक्षकार, नागरिकांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. व्ही. जोशी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. देशपांडे यांनी केले आहे.