महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनांचा लाभ
एकाच आर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी कळविले आहे.या सुविधा कार्यान्वित केल्याचे सन २०२०-२१ हे पहिले वर्ष आहे. कृषी विभागाने पोर्टलवर अर्ज करण्यासाठी दिनांक ११ जानेवारी ही अंतिम तारीख घोषित केली होती. दि. ११ जानेवारी अखेर प्राप्त सर्व अर्जासाठी लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने कृषी यांत्रिकीकरण, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीसाठी नवीन विहीर, कांदाचाळ, प्लॅस्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचा समावेश आहे. निवड झालेल्या शेतकरी बंधूना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेश देण्यात आला आहे. निवड झाल्याचा संदेश ज्या शेतकऱ्यांना/ लाभार्थींना प्राप्त झाला आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
महाडीबीटी- लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर अर्जदार शेतकऱ्यांनी करावयाची कार्यवाही- https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी संकेतस्थळावर जावे. या संकेतस्थळावर ‘शेतकरी योजना’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ‘वापरकर्ता आयडी’ या पर्यायावर क्लिक करावे. वापरकर्ता आयडीवर क्लिक केल्यानंतर ‘वापरकर्ता आयडी व पासवर्ड’ व त्याखाली प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरुन ‘लॉगइन करा’ यावर क्लिक करा. त्यानंतर अप्लाइड घटक मध्ये ‘छाननी अंतर्गत अर्ज’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण केलेल्या सर्व अर्जाची स्थिती दिसेल. स्थितीमध्ये ‘Upload Document Under Scrutiny’ अशा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झालेली आहे, असे समजावे. अप्लाइड घटक याच पृष्ठावरील मुख्य मेनूमधील ‘कागदपत्रे अपलोड करा’ या पर्यायावर क्लिक करा.त्यानंतर ‘वैयक्तिक कागदपत्रे’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दर्शविलेल्या स्क्रीन वरील कागदपत्र अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा. ‘कागदपत्र अपलोड करा’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कागदपत्र अपलोड स्क्रीन दिसेल. त्यात नमूद केलेली विहित कागदपत्रे १५ केबी ते ५०० केबी या आकारामानातच अपलोड करुन जतन करा या पर्यायावर क्लिक करा.